मुरूड : प्रतिनिधी
कोमसाप मुरूड जंजिरा शाखा आणि अंजुमन डिग्री कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 27) मराठी राजभाषा दिनानिमित्त अंजुमन डिग्री कॉलेज येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उर्दू विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा आदर वाढवा, भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने हे कवी संमेलन घेण्यात आले. कोमसापचे मुरूड शाखा अध्यक्ष संजय गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील दहा उर्दू भाषिक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित मराठी कविता सादर करून कविसंमेलन रंगतदार केले. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन उर्दू भाषिक मुलीने अगदी मराठीत सहजपणे केले. भाषेमुळेच संवाद निर्माण होऊन एकमेकांचे प्रेम वाढत असते. मराठी भाषा पुरातन काळापासून अस्तित्वात असून, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार असल्याचे गुंजाळ यांनी या वेळी सांगितले. अंजुमन इस्लामचे चेअरमन जैनुद्दीन कादिरी, सदस्य इस्माईल शेख, प्राचार्य डॉ. साजिद शेख, कोमसाप मुरूडच्या उपाध्यक्षा उषा खोत, कार्याध्यक्ष अरुण बागडे, खजिनदार प्रतिभा जोशी, सहसचिव प्रतिभा मोहिले, सहखजिनदार उर्मिला नामजोशी, जिल्हा प्रतिनिधी सिद्धेश लखमदे, युवाशक्ती प्रमुख आशिष पाटील यांच्यासह विद्यार्थी व जाणकार रसिक यावेळी उपस्थित होते.