Breaking News

रस्ते अपघातांत पुन्हा वाढ

जेएनपीटी महामार्गावर सर्वाधिक दुचाकी अपघात

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई, पनवेल, उरण या विकासात्मक विभागात निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा दुचाकी अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात हे जेएनपीटी महामार्गावर होत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे.

उरणच्या जेएनपीटी बंदराकडे जाणारे रस्ते चकाचक झाल्याने या भागात दुचाकी अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. गेल्या वर्षभरात दुचाकी अपघातांत 79 पादचार्‍यांनी जीव गमावला आहे. त्यामुळे दुचाकी अपघातांचे प्रमाण कमी कसे करता येईल, यासाठी वाहतूक पोलीस आराखडा तयार करीत आहेत. शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर महामार्ग, आता पनवेल-उरण या रस्त्यांचा कायापालट झाला आहे. जेएनपीटी बंदराकडे मोठया प्रमाणात कंटेनर वाहनांची वाहतूक होत असल्याने सुसाट प्रवासात दुचाकी चालकांचा बळी जात आहे.

या मार्गावर दुचाकीस्वारांसाठी वेगळी मार्गिका तयार करता येईल का, याची चाचपणी पोलीस करीत असून तशा सूचना जेएनपीटी बंदर प्रशासनाकडे करण्यात येणार आहेत. शीव-पनवेल, पामबीच, ठाणे- बेलापूर, आणि जेएनपीटी बंदर मार्गावरील प्रवास अधिक जलद व तितकाच अधिक धोकादायक झाला आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा आराखडा वाहतूक पोलीस विभाग तयार करीत आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे. आता जेएनपीटी बंदराकडे जाणार्‍या महामार्गावर हे प्रमाण वाढले आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक असून येत्या आठवडाभरात याबद्दल अहवाल तयार केला जाणार आहे. त्याचप्रमाणे स्थानिक प्राधिकरणांशी चर्चा करून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

-पुरुषोत्तम कराड, उपायुक्त, (वाहतूक) नवी मुंबई पोलीस विभाग

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply