सुरक्षित लस शोधण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश आले असून सर्व उमेदवारांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती उत्तमरीत्या काम करीत असल्याचा दावा रशियाने मंगळवारी करताच पाठोपाठच डोनाल्ड ट्रम्प यांनीही लशीसंबंधी मोठी बातमी असे ट्वीट केले. अवघ्या मानव जमातीचे जिणे मुश्कील करणार्या कोरोना विषाणूवर लवकरात लवकर सुरक्षित लस यावी असे आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत आहे, परंतु मानवी आरोग्यापलीकडच्या अन्य हेतूंनी प्रेरित होऊन लस बाजारात आणण्याची अवाजवी घाई
ट्रम्प वा अन्य कोणाकडूनही होता कामा नये.
कोरोनाच्या विळख्यात सापडलेले जग अजूनही त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेऊ शकलेले नाही. या घातक विषाणूचा फैलाव सुरू होताच अनेक देशांनी त्याविरोधातील उपाययोजनांचा एक भाग म्हणून लॉकडाऊनचा आधार घेतला होता, परंतु लॉकडाऊन पाठोपाठ आर्थिक मंदी आणि बेरोजगारी आ वासून समोर उभी ठाकल्यामुळे अनेक देशांनी आर्थिक व्यवहार हळूहळू पुन्हा सुरू केले, परंतु त्यातून व्हायचे तेच अघटित घडताना दिसू लागल्यामुळे आताच्या घडीला जगभरातील अनेक शहरे व प्रांत पुन्हा एकदा लॉकडाऊनच्याच उपायाकडे नाईलाजाने वळताना दिसत आहेत. कोरोनासंबंधी परिस्थितीचा असा आशा-निराशेचा खेळ जवळपास जगभरातच सुरू असताना रशियाने कोरोनावर सुरक्षित लस शोधण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश आल्याचा दावा मंगळवारी केला. 28 दिवसांपूर्वी ही लस दिलेल्या सर्व 18 उमेदवारांमध्ये कोणत्याही स्वरूपाचे दुष्परिणाम, आरोग्यविषयक तक्रारी वा गुंतागुंत दिसून आली नाही. त्यामुळेच लशीच्या या प्रयोगाबद्दल तसेच तिच्या सुरक्षिततेबद्दल आपण खात्रीने दावा करीत असल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रशियातील या लशीच्या वैद्यकीय चाचण्या जुलैअखेरपर्यंत पूर्ण होणार असून सध्या ही लस दिलेल्या उमेदवारांचा आणखी एक गट विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली आहे. जगभरातच कोरोनावरील लशीचे संशोधन वेगात सुरू असून यात सर्वांत आघाडीवर असल्याचे मानल्या जाणार्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीबद्दलही गुरुवारपर्यंत सकारात्मक बातमी अपेक्षित आहे. या लशीच्या तिसर्या टप्प्यातील चाचण्यांना गेल्या महिन्यात ब्राझिलमध्ये सुरुवात झाली असून त्यात हजारो उमेदवारांचा सहभाग आहे. लशीच्या चाचण्यांना वेग देण्याचा प्रयत्न सगळेच करीत असताना रशियापाठोपाठच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सिन’ असे ट्वीट केले आहे. त्यांच्या ट्वीटमध्ये कोणतेही तपशील नसले तरी ट्रम्प लशीसंदर्भात मोठी घोषणा करू शकतात असा त्याचा अर्थ लावला जात आहे. अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीने विकसित केलेल्या लशीनेही चाचण्यांचा पहिला टप्पा ओलांडला असून ती सुरक्षित असल्याचे तसेच उमेदवारांमधील रोगप्रतिकारकशक्तीला चालना देत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनातून बर्या झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येणार्या अँटिबॉडीज वेगाने कमी होत जातात. त्यामुळे कालांतराने या रुग्णांना कोरोनाची बाधा पुन्हा होऊ शकेल असे संशोधनातून पुढे येत असतानाच लशीच्या प्रयोगात सहभागी झालेल्या उमेदवारांमध्ये चांगल्या तर्हेने अँटिबॉडीज तयार होत आहेत ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. मॉर्डना ही लशीची मानवी चाचणी सुरू करणारी जगातील पहिली कंपनी आहे. वेगाने लस निर्मिती करण्यासाठी अमेरिकन सरकारनेही या कंपनीला निधी उपलब्ध करून दिला आहे, परंतु पुढील वर्षीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ट्रम्प यांनी लस आणण्यासाठी नको इतकी घाई करता कामा नये, असा सूर अमेरिकेतील तज्ज्ञांकडून लावला जात आहे. ट्रम्पच काय एकंदरीतच कुणाच्याही दबावाखाली न येता मानवी चाचण्यांचे सर्व सुयोग्य टप्पे पार पाडून बाजारात आलेली लसच मानव जमातीसाठी हितकारक ठरेल.