नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
ठाणे व रायगड जिह्यातील पत्रकारिता क्षेत्रात दादा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय अशोक जालनावाला यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त गुरुवारी (दि. 23) वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी स्वर सुमनांजलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहताना त्यांच्या पत्रकारितेतील कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.
कै. अशोक जालनावाला यांनी पत्रकारिता क्षेत्रात कार्य करताना समाजातील विविध प्रश्नांना नुसती वाचा फोडली नाही, तर त्या प्रकरणांना शेवटपर्यंत तडीस नेऊन त्यांना न्याय मिळवून दिला. लोकांना अन्याया विरूध्द लढायला शिकवले, त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सचोटीने प्रयत्न केले. त्यामुळेच लोकांची त्यांच्यावरील विश्वासार्हता वाढत गेल्याने नवी मुंबईच्या जडण घडणीत दिवंगत अशोक जालनावाला यांचे योगदान मोठे असल्याचे सुतोवाच आमदार गणेश नाईक यांनी या वेळी केले.
कै. अशोक जालनावाला यांच्या स्वभावातील करारीपणा उत्कृष्ट देहबोली, बोलण्यातील जरब या गोष्टी इतरांपेक्षा उजव्या असल्याने प्रथमदर्शणीच समोरच्यावर त्यांची छाप पडल्याशिवाय राहत नसे, अशा भावना या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केल्या.
बातमीतील अनन्यपणा हे त्यांचे पत्रकारितेतील सर्वांत मोठे बलस्थान, वैशिष्टय होते. अतिशय निर्भिड आणि निडर राहिल्यामुळे पत्रकरितेतील सर्व आव्हानांना कै. अशोक जालनावाला समर्थपणे पेलू शकले. पत्रकारितेत बातमीसाठी त्यांच्याकडे असलेली उत्तम तिक्ष्ण नजर आणि समोरच्याने न बोललेलेही ऐकू येणारे कान त्यांच्यापाशी होते, असे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार हेमंत जुवेकर, विकास महाडिक, नारायण जाधव, जयेश सामंत व राज्याच्या माहिती विभागाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ यांनीदेखील कै. अशोक जालनावाला यांच्या सोबत पत्रकारिता क्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक निलेश जालनावाला यांनी तर आभार मनोज जालनावाला यांनी मानले. सूत्रसंचालन महापालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी केले.
दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिल्यानंतर पं. संजीव अभ्यंकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांच्या स्वर सुमनांजलीने उपस्थित श्रोतेगण मंत्रमुग्ध झाले.