Breaking News

पक्षी-प्राणी गणनेसाठी कर्नाळा अभयारण्यात ट्रॅक कॅमेरे

पनवेल ः प्रतिनिधी

कर्नाळा अभयारण्यातील पक्षी-प्राण्यांची गणना करण्यासाठी वन्यजीव विभागामार्फत शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी अभयारण्यातील विविध भागात ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले होते. दरवर्षी बुद्धपौर्णिमेला वन्यजीव विभागामार्फत पक्षी-प्राण्यांची गणना करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो.

पनवेलपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. सुमारे 12.155 चौरस किलोमीटरच्या परिसरात हे अभयारण्य वसले आहे. स्थानिक तसेच स्थलांतरित 147 प्रजातीचे पक्षी या ठिकाणी आहेत. यामधील काही स्थलांतरित पक्षी आहेत. विविध प्रकारच्या हिंस्र प्राण्यांचाही या ठिकाणी अधिवास आहे. या प्राण्यांच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यासाठी वन्यजीव विभागामार्फत चार ठिकाणी ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले होते. शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत हे कॅमेरे कार्यरत होते. सध्याची वातावरणातील स्थिती तसेच वाढता उकाडा पाहता पाणथळ्याशेजारी हे कॅमेरे लावण्यात आले. या ट्रॅक कॅमेर्‍यांमध्ये एक चीप बसवण्यात आल्याने प्राण्यांची हालचाल झाल्यास त्यांचे छायाचित्रच कॅमेर्‍यात कैद होणार आहे. प्राण्यांच्या पायांचे ठसेही हा कॅमेरा टिपणार आहे. कॅमेर्‍यातील चीपमध्ये कैद झालेल्या छायाचित्रांच्या आधारे नव्याने प्राणी व पक्ष्यांची गणना केली जाणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply