Breaking News

दागिने खेचून पळणारा सराईत गुन्हेगार गजाआड

पनवेल ः वार्ताहर

पनवेल शहर परिसरात तसेच खांदा वसाहत परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या अटकेनंतर आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पनवेल शहर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळून जाण्याचे गुन्हे वाढले होते. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने व पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी, पोलीस उपनिरीक्षक आकाश शिंदे, हवालदार राऊत, परेश म्हात्रे, वायकर, पारासुर, गंथडे, वाघमारे, महेश पाटील, मिसाळ, भगवान साळुंके, देशमुख, घरत आदींच्या पथकाने त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज व बातमीदाराकडून माहिती घेऊ न आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी एसटी स्टॅण्ड परिसरात आल्याची माहिती पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचून आकाश घाडी (25 रा. विचुंबे) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आतापर्यंत 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्या अटकेमुळे अजूनही चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 तळोजात मंगळसूत्र खेचले

तळोजा येथे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 80 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र खेचून चोरटे पसार झाले आहेत. चोरट्यांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तळोजा फेस टू येथील सुनीता सुभाष शिंदे या कारने डोंबिवली येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्या नावडे फाटा येथे उतरल्या. रस्ता ओलांडण्यासाठी थांबले असताना दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेले.

  धानसर येथे घरफोडी

धानसर येथे वर्कशॉपच्या मुख्य प्रवेशदाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भांडूप, कांजूरमार्ग येथील मदन गुंजाळ यांचे श्रेया इंटरप्रायजेस, धानसर येथे फॅब्रिकेशन वर्कशॉप आहे. त्यांच्या वर्कशॉपचे कुलूप तोडून चोरट्यांनी लोखंडी बीम, स्टील प्लेट असा दोन लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply