नवी मुंबई : प्रतिनिधी
सिवूडस येथील डीएव्ही पब्लिक स्कूलने शाळेच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त फी घेऊ नये यासाठी पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मंगळवारी (दि. 22) सकाळी सर्व पालक शाळेसमोर एकवटून डीएव्ही शाळा अतिरिक्त फी का वसूल करते? याचा जाब विचारण्यासाठी जमले असता शाळेच्या मुख्याध्यापका कांचन मनोजा यांनी पालकांना वेळ देऊनदेखील भेट न दिल्यामुळे संतापलेल्या पालकांनी आपला मोर्चा नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर धडकवला. दरम्यान, डीएव्ही शाळा व्यवस्थापक आणि पालकांची अतिरिक्त फी व इतर तक्रारी संदर्भात सुनावणी बुधवारी (दि. 23) दुपारी 2 वाजता बेलापूर येथील मुख्यालय, शिक्षण विभाग दालन येथे होणार आहे. नेरूळमधील सीवूड्स सेक्टर 48 येथील डीएव्ही पब्लिक शाळेची वार्षिक फी प्रती विद्यार्थी अधिकच आहे. कोरोनाच्या काळातही शाळेची फी पालक भरत आहेत, मात्र विद्यार्थ्यांची इतर फी घेऊ नये अशी पालकांची एकमुखी मागणी आहे. अतिरिक्त फी घेऊ नये यासाठी शाळेच्या शेकडो पालकांनी शाळेवर धडक देऊन निषेध नोंदवला. या वेळी भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव, भाजप युवा मोर्चा नवी मुंबई अध्यक्ष दत्ता घंगाळे, स्नेहा नाईक, रणजित निंबाळकर, आकांक्षा पाटील, मानसी राऊत यासह शेकडो पालक उपस्थित होते. शाळा व्यवस्थापक भेट देत नसल्याने पालकांनी बेलापूर येथील मुख्यालय गाठले तेथील शिक्षण विभागाचे उपायुक्त जयदीप पवार यांची भेट घेऊन संतप्त पालकांनी आपली बाजू मांडली. दरम्यान, डीएव्ही शाळेचे संचालक आणि पालकांची बैठक बुधवारी बोलवण्यात आली असून वाढीव फी तसेच अन्य तक्रारीवर सुनावणी होणार असल्याचे उपायुक्त पवार यांनी सांगितले.