गेले दोन महिने सर्वतोपरि कोरोनाशी लढा देऊनही रुग्णसंख्या घटत नसल्याने काहिशा हतबल अवस्थेत असलेल्या महाराष्ट्रासमोर ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या रूपाने आणखी एक मोठे संकट उभे राहिले. या चक्रीवादळाने विशेषत: रायगड जिल्ह्याला मोठा तडाखा दिला असून सर्व वादळग्रस्तांच्या पाठिशी उभे राहणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.
एका मागोमाग एक मोठी संकटे आली की एका तर्हेने आपल्याला संकटांचे काही वाटेनासे होते. एक प्रकारच्या निर्ढावलेपणाने किंवा धैर्याने आपण त्याला सामोरे जातो. तसेच काहिसे ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या प्रतिसादाबद्दल म्हणावे लागेल. कोरोना फैलावाच्या संदर्भात दीर्घकाळ क्रमांक एकवर राहण्याची नामुष्की ओढवलेल्या महाराष्ट्रातील सरकारी यंत्रणेची चक्रीवादळाच्या संदर्भात पहिली प्रतिक्रिया ‘हाय रे, दैवा’ स्वरुपाचीच होती. परंतु कोरोना आघाडीवरील अपयशामुळेच चक्रीवादळाच्या बाबतीत राज्यातील तीन चाकी सरकारला हलगर्जीपणा करून परवडणारे नव्हते. लोकांना योग्य ती सुरक्षितता पुरवण्यात सरकार अपयशी ठरले असते तर सरकारवर मोठीच नामुष्की ओढवली असती. त्यामुळेच की काय, राज्य सरकारने किनारपट्टीच्या भागातून लोकांना प्रचंड संख्येने सुरक्षित स्थळी हलवले. त्याचा निश्चितच फायदा झाला. ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागनजीक किनारपट्टीवर धडकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे सरकारने रायगड जिल्ह्यात तसेच नजीकच्या मुंबई शहरातही किनारपट्टीच्या भागात मोठी खबरदारी घेतली. उरण परिसरातील दीड हजार लोकांना अन्यत्र हलवण्यात आले होते. अलिबाग येथे वादळ येऊन धडकले तेव्हा काही काळ वार्याचा वेग 120 किमी प्रति तास इतका भीषण होता असे सांगितले जाते. त्याआधी आणि नंतरही काही काळ तो 110 ते 120 किमी प्रति तासच्या दरम्यान होता. अर्थातच इतक्या प्रचंड वेगवान वार्यासमोर जुनी, वठलेली झाडे टिकाव धरणे शक्यच नव्हते. किनारपट्टीच्या संपूर्ण परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. अगदी रत्नागिरी तालुका, रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीचा भाग यांपासून मुंबई शहरापर्यंत अनेक ठिकाणी झाडे कोसळली. मुंबईत एक-दोन ठिकाणी ही झाडे मोटारींवर कोसळल्याने त्यांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांचेही नुकसान झाले आहे. घोंघावणार्या वार्यांमुळे घरांवरील पत्रे वा छत मोठ्या प्रमाणात उडून गेले. रोेहा तसेच श्रीवर्धन परिसराला वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुरुड परिसरातही मालमत्तेचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीला ‘निसर्ग’चा मोठा फटका बसला आहे. गुहागरमध्ये वार्याचा वेग प्रचंड होता. काही ठिकाणी किनार्यावरील पाणी घरात शिरल्यामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अंदाज त्यांचे पंचनामे झाल्यानंतरच येईल. लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे जीवितहानी टळली असली तरी कोरोनाच्या टांगत्या तलवारीमुळे आता या लोकांची कोरोना चाचणी झाल्यास त्यांच्या एकत्र येण्यातून होणार्या फैलावाला थोडाफार अटकाव करता येऊ शकेल. कोरोनाचा फैलाव व त्यामुळे लादण्यात आलेला लॉकडाऊन यांतून लोक आधीच गांजलेल्या अवस्थेत आहेत. अनेकांचे पोटापाण्याचे उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. त्यात आता हे ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट. त्यामुळे चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लोकांना पुन्हा उभे राहण्यास सरकारने मदत करायलाच हवी आहे. वादळ शमले की हा विषय मागे पडला असे होता कामा नये. सरकारने या सार्या लोकांना पुन्हा उभे राहण्यास मदतीचा हात द्यायलाच हवा आहे.