अलिबाग : प्रतिनिधी
आरसीएफ कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर यंत्र उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना हृदय विकारावरील अँजिग्राफी किंवा कॅन्सरसारख्या आजाराचे निदान करण्यासाठी आता मुंबईत जावे लागणार नाही.
कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर यंत्राचे लोकार्पण मंगळवारी (दि. 22) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने याच्या हस्ते करण्यात आले. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता महेंद्र कुरा, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, क्ष किरण विभाग प्रमुख सुहास ढेकणे, आरसीएफ जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांच्यासह परिचारिका, डॉक्टर, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
शरीरात रक्तभिसरण क्रिया सुरू असताना काही वेळा रक्ताच्या गाठी तयार होऊन हृदयविकार उत्पन्न होतो. हृदयाच्या आजाराचे अथवा कॅन्सर किंवा पोटातील आजाराचे निदान करण्याची सुविधा रायगडात उपलब्ध नाही. अँजिओग्राफी, कॅन्सरसारख्या आजाराचे निदान करण्यासाठी मुंबई, पुणे या शहरात जावे लागते. यासाठी हजारो रुपये खर्च करावा लागतो. या आजाराचे निदान करणे खर्चिक असल्याने अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागतात.
आरसीएफ कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून सहा लाखाची कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर यंत्र अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला दिले. हे यंत्र चालविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील क्ष किरण विभागातील चार जणांना जेजे रुग्णालय मुंबई येथे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे प्रशिक्षित कर्मचारीही उपलब्ध आहेत. सिटीस्कँनच्या माध्यमातून रुग्णाला या मशीनद्वारे इंजेक्शन देऊन त्याच्या आजाराचे निदान काही वेळातच कळणार आहे. त्यामुळे त्या रुग्णाला त्वरित पुढील उपचार मिळणार आहेत. रायगडात खाजगी रुग्णालयात ही सुविधा काही प्रमाणात असली तरी ती खर्चिक असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी आहे, मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्याने चारशे ते आठशे रुपयात आजाराचे निदान होणार आहे. त्यामुळे रायगडकरांना फायदा होणार आहे.