Breaking News

माणसांपरिस माकडं बरी!

जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होतात. भारतात दर तासाला 53 अपघात होतात. दर चार मिनिटाला एकाचा मृत्यू होतो. सिग्नल क्रॉस करणे, ओव्हरटेक करणे, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, रस्त्यांची खराब स्थिती, वाहन चालक व पादचार्‍यांंची चूक अशा अनेक गोष्टी अपघातांसाठी कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे.आपण अनेक वेळा रस्ता ओलांडण्यासाठी असलेल्या  पादचारी पूलाचा वापर करीत नाही, त्यामुळे अपघात घडतात. मात्र कर्नाळा अभयारण्यातील माकडे एखाद्या शहाण्या माणसाप्रमाणे महामार्ग ओलांडताना त्यांच्यासाठी खास बनवलेल्या ‘मंकी लॅडर‘ चा वापर करताना दिसतात. त्यामुळे म्हणावेसे वाटते की, ’माणसांपरिस माकडं बरी’

पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्य जरी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध  असले तरीसुद्धा या अभयारण्यात वन्यप्राणी जीवन बघायला मिळते. रानडुक्कर, ससे, माकड, रानमांजर, भेकर, कोल्हा, मुंगूस, साळींदर आणि वानरांच्या काही जाती आणि क्वचित एखादा बिबट्या या अभयारण्यात हमखास आढळतो. या अभयारण्यातून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग जातो. महामार्गाच्या दुतर्फा वन खात्याने माकडे रस्त्यावर येऊ नयेत, यासाठी पत्र्याचे कंपाउंड केले आहे. माकडांना  रस्ता ओलांडून पलीकडे जाण्यासाठी 10 भुयारी मार्ग ठेवण्यात आले आहेत. याशिवाय मंकी लॅडर बनविण्यात आला आहे. त्याचा वापर करून अनेक वेळा माकडे महामार्गा ओलांडून  जाताना दिसतात.

कर्नाळा अभयारण्यामधील महामार्गावरून अनेक पर्यटक जात-येत असतात. प्राण्यांना खायला देऊ नका, दंड आकाराला जाईल, असे फलक वन खात्याने या परिसरातील महामार्गावर लावले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पर्यटक झाडावर किंवा कंपाउंडच्या पत्र्यावर बसलेल्या माकडांना केळी, वेफर्स व इतर पदार्थ खायला टाकतात. ते घेण्यासाठी रस्ता ओलांडून येताना वाहनाखाली येऊन महिन्याला तीन-चार माकडांचा मृत्यू होतो. त्यातुलनेत माणसांचे रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र बहुतांशी माकडे  रस्ता ओलांडण्यासाठी मंकी लॅडरचा वापर करतात. त्यांना पाहून दादा कोंडके यांच्या’ एकटा जीव सदाशिव ’ चित्रपटातील ’माणसांपरिस मेंढरं बरी’ या गाण्यामध्ये बदल करून ’माणसांपरिस माकडं बरी’ असं म्हणण्याची वेळ आली आहे. याशिवाय माकडांना केळी, वेफर्स व इतर पदार्थ खायला देऊन आपण मुक्या प्राण्यांच्या आरोग्याशी खेळतोय, याची कल्पनासुध्दा कोणीच करीत नाही. याबाबत आता प्राणीप्रेमी संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

करोना होता त्यावेळी पर्यटक नसल्याने वानरे अभयारण्यातील महामार्गावर येत नव्हती. आता पुन्हा खायला मिळते म्हणून महामार्गाच्या कडेला, झाडावर किंवा पत्र्यावर माकडे बसतात. खायला दिल्यानंतर ही माकडे महामार्गावर येतात. आम्ही त्यासाठी फिरत असतो. कोण खायला देताना दिसल्यास दंड वसूल करतो. आठवड्याला दोन ते चार हजार रुपये दंड वसूल होतो.

-विलास राठोड, वनरक्षक, कर्नाळा अभयारण्य

माकड बनले ‘अंकल फॅटी’

बँकॉक इथल्या फ्लोटिंग मार्केटमधील एक माकड ‘अंकल फॅटी’ म्हणून  प्रसिद्ध आहे. पर्यटकांनी फेकलेले जंक फूड खाऊन खाऊन या माकडाचे पोट एवढे सुटले आहे की, त्याचे हिंडणे फिरणेही आता अवघड झाले आहे. या माकडाचे वजन त्याच्या मूळच्या वजनापेक्षाही दुप्पट वाढलंय. वजनामुळे त्याला नीट हिंडता फिरताही येत नाही. पण तिथल्या पर्यटकांना मात्र हे लठ्ठ माकड पाहून फारच गंम्मत वाटते. जनजागृतीसाठी याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शेवटी इथल्या प्राणीप्रेमी संघटनांनी पुढाकार घेतला आहे आणि लवकरच या लठ्ठ माकडाला ‘फॅट कँम्प’मध्ये पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तेथे उपचार करून त्यांचे वजन कमी करण्यात येईल.

-नितीन देशमुख, खबरबात

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply