पेण : प्रतिनिधी
चैत्र शुद्ध प्रतिपदेला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा गुढीपाडवा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी पेण येथील आई डे केअर या विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर गुढ्या बनवून रोजगारनिर्मिती केली आहे.
सध्या बाजारात गुढीपाडव्यासाठी लागणारी काठी, साखरमाळ, वस्त्र, तांब्याचा गढू आदी गोष्टी आल्या आहेत, मात्र अनेकजण या धावत्या युगात सर्व वस्तू आणून गुढी उभारण्यापेक्षा आयती तयार गुढी उभारण्याला पसंती देत आहेत. याच तयार गुढ्या बनविण्याचे काम पेण तालुक्यातील आई डे केअर या विशेष मुलांच्या शाळेत सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
आई डे केअर शाळेतील वैभव गायकवाड, रत्नाकर ठाकूर, चेतन पाटील, अमृता पाटील, स्वाती गायकर आदी विशेष मुले एकमेकांना सहकार्य करून गुढीचा स्टॅण्ड तयार करणे, रंगकाम-नक्षीकाम करणे, गुढीला सजवण्यासाठी माळा तयार करणे, कापडाची तयारी करणे, गुढी पूर्णपणे सेट करणे आदी कामे करण्यात गुंतली आहेत. या गुढ्या तयार झाल्यानंतर त्या एवढ्या आकर्षक दिसतात की ग्राहकदेखील त्या घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत. या शाळेतील मुलांनी तयार केलेल्या गुढ्यांना पेणसह पुणे, मुंबई, ठाणे, खारघर, वाशी, पनवेल आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे.
कष्टाची कमाई
आई डे केअर या विशेष शाळेतील विद्यार्थी दरमहा शंभर रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत स्वकष्टाने कमवत आहेत. त्यामुळे त्यांची कला व कष्ट काय असतील याची कल्पना येऊ शकते. येथील मुलांनी गुढीपाडव्यासाठी फक्त गुढ्याच नाही, तर साड्यादेखील तयार केल्या आहेत. गुढी 200-250 आणि 300 रुपयांना, तर साडी 140-150 ते 200 रुपयांपर्यंत विकली जात आहे.
आमच्या शाळेतील मुले फक्त गुढीपाडव्यालाच नव्हे; तर प्रत्येक सणाला हव्या असणार्या वस्तू अप्रतिम बनवत असतात. या मुलांनी बनवलेल्या गुढी आणि इतर वस्तू शाळांनी, संस्थांनी तसेच व्यक्तिंनी एखाद्याला भेटवस्तू देण्यासाठी घ्याव्यात, जेणेकरून त्या वस्तू विकल्या गेल्याने आलेले पैसे मुलांच्या खात्यात जमा होतील व त्यांना आर्थिक आधार मिळेल.
-स्वाती मोहिते, कार्याध्यक्ष,आई डे केअर स्कूल, पेण