कार्यकर्ता बैठकीत भाजप नेते रविशेठ पाटील यांचे आवाहन



पेण : प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकारच्या कार्यप्रणालीवर देशातील आम जनता खूश असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी पेण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आपली कामगिरी चोख पार पाडावी व भाजपच्या विजयी अभियानास प्रारंभ करावा, असे आवाहन भाजप नेते व माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी येथे केले.
रविशेठ पाटील यांच्या पेणमधील वैकुंठ निवासस्थानी भाजपच्या शक्तिप्रमुख, बूथ प्रमुखांसह कार्यकारिणीची बैठक झाली. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. भाजपच्या शक्तिप्रमुख, बूथप्रमुख व कार्यकर्त्यांनी वाडीवस्तीपासून ते मोठमोठ्या गावापर्यंत भाजपचे मताधिक्य कसे वाढेल यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते आनंद महादेव भगत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मतदान केंद्रानुसार पेणमध्ये 225 शक्तिप्रमुख व बूथप्रमुखांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. पेण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते स्वत: शक्तिप्रमुख व बूथप्रमुखांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे त्यांनी आपला गृहपाठ व्यवस्थित करावा, असे रविशेठ पाटील म्हणाले.
पेण शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनात्मक बांधणीत उत्तम प्रकारे काम केले आहे. तशाच प्रकारचे काम ग्रामीण विभागातही आपण करावे, असे रविशेठ पाटील यांनी स्पष्ट केले. या वेळी अनंत पाटील, जांभळे सर, शिवाजी पाटील, कृष्णा वर्तक यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनीही आपले विचार मांडले. पेण तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष शिवाजी पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत पाटील, एकनाथ पाटील, कृष्णा वर्तक, वाशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीकांत पाटील, जांभळे सर, डोलवीचे अरुणशेठ म्हात्रे यांच्यासह कासू विभागातील अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीमुळे भाजपला इथे कधी नव्हे इतके अनकूल वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो असून, मला पेण तालुक्यातून 40 हजारांचे मताधिक्य मिळवून देऊन विरोधकांना त्यांची जागा दाखविण्याचे काम कार्यकर्ते करतील याची मला खात्री आहे.
-रविशेठ पाटील, भाजप नेते, पेण