Breaking News

फेरीबोटींच्या तिकीट दरात तफावत; प्रवाशांची नाराजी

मुरूड : प्रतिनिधी

आगरदांडा ते दिघी या एकाच सागरी मार्गावर चालणार्‍या दोन रोरो फेरी बोट सेवांच्या तिकीट दरात मोठी तफावत असल्याने प्रवाशांत नाराजी निर्माण आहे.

आगरदांडा व दिघी ही दोन महत्त्वाची बंदरे आहेत. मुरूड, म्हसळा, श्रीवर्धन या तीन तालुक्यांना जोडणारा रोरो फेरी बोट सेवा हा महत्त्वाचा दुवा आहे. या ठिकाणी येणार्‍या दोन चाकी, चार चाकी, सहा चाकी अशा वाहनांची वाहतूक या फेरी बोटींतून होत असते. मुरूडला येणार्‍या पर्यटकांना श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर या ठिकाणी जाण्यासाठी हा प्रवास सोयीस्कर होत आहे. सुवर्णदुर्ग शिपींग कार्पोरेशन आणि दिघी जलवाहतूक सहकारी सोसायटी या दोन कंपन्या आगरदांडा ते दिघी या सागरी मार्गावर रोरो फेरी बोट चालवतात. मात्र या दोघांच्या तिकिट दरात किमान पन्नास रुपयांचा फरक आहे. दिघी जलवाहतूक सहकारी सोसायटीच्या फेरी बोटीला 176 तर सुवर्णदुर्ग शिपिंग कार्पोरेशनच्या फेरी बोटीला 225 रुपये तिकीट दर आहे. या दोन्ही कंपन्याच्या तिकीट दरात 50 रुपयांचा फरक आहे. एकच मार्ग व सुविधासुद्धा समान मात्र तिकीट दरात मोठा फरक असल्याने प्रवाशांत नाराजी आहे.

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून आम्हाला तिकीट दर वाढवण्याची परवानगी मिळाली असल्याचे सुवर्णदुर्ग शिपिंग कार्पोरेशनने सांगितले. तर आम्ही दिलेला तिकीट दरवाढीचा प्रस्ताव एक वर्ष झाला तरी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड (एमएमबी) ने मंजूर केलेला नाही. म्हणून आमचे तिकीट दर जुनेच आहेत. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता हे आम्हाला परवडत नाही, असे दिघी जलवाहतूक सहकारी सोसायटीकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या दोन्ही फेरी बोटीचे तिकीट दर समान करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल, असे  महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply