नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई शहरात दोन वर्षे करोना काळातील संकटामुळे नियमांच्या चौकटीत दिवाळी साजरी करावी लागली, परंतु आता निर्बंधमुक्त वातावरणात दिवाळी साजरी करण्यात येत असताना सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. एकीकडे उत्साहात दिवाळी साजरी केली जात असताना दुसरीकडे बेकायदा फलकबाजीला ऊत आल्याचे चित्र पहायला मिळाले होते, परंतु दिवाळीच्या सुटीनंतर शुक्रवारी (दि. 28) शहरातील फलकबाजीवर कारवाई करण्यात आली आहे.नवी मुंबई शहरात पालिकेची परवानगी घेऊन व पालिकेने निश्चित केलेल्या जागेतच फलक लावता येतात, परंतु दिवाळीच्या उत्साहात शहरभर फलकबाजी पाहायला मिळते. त्यावर कारवाई करीत बहुतांश सर्वच विभागातील फलक हटवण्यात आले आहेत. रेल्वेस्थानक परिसर, मुख्य जागा, चौक याठिकाणी बेकायदा फलक लावण्यात आले होते. त्यामुळे दिवाळीच्या सणात शहराचे विद्रूपिकरण झाल्याचे चित्र होते. दिवाळीत शनिवार, रविवार व सोमवार अशी सलग तीन दिवस सुटी असल्याने या फलकबाजी करणार्यांचे फावले होते. देशपातळीवर नुकताच नवी मुंबई महापालिकेला स्वच्छ व सुंदर शहराचा देशातील तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे, परंतु सध्या दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शहरात बॅनरबाजीला ऊत आला होता. त्यावर पालिका विभाग अधिकार्यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहरात दिवाळीच्या सणानिमित्त शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. विनापरवाना बॅनर्स हटवण्यात आले आहेत. पालिका अतिक्रमण विभाग व विभाग अधिकार्यामार्फत दैनंदिन कारवाई करण्याचे आदेशित केले आहे.
-दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, परिमंडळ-1