उरण : प्रतिनिधी : भारत देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे पूर्ण झाली. या 70 वर्षात आपला देश जगभरात सार्वभौम देश म्हणून ओळखला जाऊ लागला असतानाच गेल्या तीन दशकापासून देशाला अतिरेकी संघटनांचे आणि दहशतवादाचे ग्रहण लागले असून, या तीन दशकात लहान-मोठे असे अनेक अतिरेकी हल्ले भारतीय जवानांवर झाले आहेत. या हल्ल्यात अनेक जवान शहीदही झाले आहेत. या सर्व हल्ल्यांमध्ये मुंबईवर झालेला 26/11चा दहशतवादी हल्ला आणि 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे भारतीय जावानांवर अतिरेक्यांनी अचानकपणे करण्यात आलेला भ्याड हल्ला हा भारतीय जवानांना लक्ष्य करणारा आहे.
पुलवामा येथील हल्ल्यात देशाचे तब्बल 40 जवान शहीद झाले. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देशभरातून अनेक संघटना, संस्था देशांतील मंदिरांच्या संस्थानांकडून आर्थिक मदत देण्यात आली. यामध्ये उरण तालुक्यातील जेएनपीटीचे तिसरे बंदर म्हणून ओळख असणार्या जीटीआय अंतर्गत कामगार संघटनाच्या वतीने या 40 जवानांमधील महाराष्ट्रातील दोन जवानांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला असून, या कामगार संघटनेने केलेले कार्य सर्वत्र कौतुकास्पद आहे. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले.
त्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांपैकी महाराष्ट्रातील चोरपांग्रा, लोणार येथील शहीद जवान नितीन राठोड आणि मलकापूर, बुलढाणा येथील शहीद जवान संजय रजपूत या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून जीटीआय अंतर्गत कामगार संघटनांच्या वतीने एक लाख 20 हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत प्रत्यक्ष जवानांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेऊन संघटनेच्या पदाधिकार्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांच्या वारसांकडे सुपूर्द करण्यात आली. संघटनेच्या वतीने जनरल सेक्रेटरी आशिष अशोक कडू, सोनारी, उपाध्यक्ष राजाराम वामन म्हात्रे, जासई, सहजनरल सेक्रेटरी पंकज कृष्णा घरत, नवीनशेवा हे उपस्थित होते. जवानांप्रती संघटनेने दाखविलेल्या या निःस्वार्थी मदतीचे आणि सहकार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जेएनपीटी बंदराशी संलग्न असणार्या जीटीआय या तिसर्या बंदरातील कामगारांनी जवानांप्रती निष्ठा दर्शविली आहे.