तळेगाव कालव्याला सोडले पाणी; शेतकरी सुखावले
माणगाव : प्रतिनिधी
डोलवहाळ बंधार्याचे पाणी कालव्याला सोडणे बंद केल्यामुळे माणगाव तालुक्यातील तळेगाव परिसरातील भातशेती पिकण्याआधीच सुकली होती. त्याचे वृत्त प्रसिध्द होताच पाटबंधारे विभागाने तळेगाव मार्गावरील कालव्याला बुधवारी (दि. 6) पाणी सोडले. त्या भागातील भातशेतीचे होणारे नुकसान टळले आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही माणगाव तालुक्यात डोलवहाळ बंधार्याच्या पाण्यावर उन्हाळी भाताचे पिकाची लागवड शेतकर्यांनी केली आहे. मात्र यंदा कालव्याला मुदतीत पाणी न सोडल्याने तसेच दोन वेळ अवकाळी पाऊस पडल्याने शेतकर्यांनी कमी प्रमाणात भात पिकाची पेरणी केली होती. या वर्षी माणगाव तालुक्यात फक्त 98 हेक्टर म्हणजेच 245 एकरवर भात पिक लागवड करण्यात आली आहे.
दरम्यान, महिन्याभरापासून कालव्याला पाणी न आल्याने माणगाव तालुक्यातील तळेगाव परिसरातील शेती धोक्यात आली होती. या परिसरातील भाताची रोपे सुकत चालली होती. त्यामुळे शेतकर्यांनी पाटबंधारे विभागाला तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच पाटबंधारे विभागाला जाग आली. त्यांनी बुधवारी तळेगाव कालव्याला पाणी सोडले. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आनंदित झाले आहेत.