पनवेल : वार्ताहर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत पनवेल महानगरपालिका आणि सीएससी यांच्यामार्फत असंघटित कामगारांची ऑनलाइन नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मंगळवारी (दि. 12) कळंबोली येथील लेबर नाका, आंबेडकर भवन येथून करण्यात आली. या वेळी नाका कामगारांची ई-श्रम ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. या कार्यक्रमास उपायुक्त विठ्ठल डाके उपस्थित होते. त्यांनी यावेळी नोंदणी करताआलेल्या नाका कामगारांचा सत्कार केला. एका दिवसात कळंबोली येथे सुमारे 125 कामगारांची नोंदणी या ठिकाणी करण्यात आली. केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने दि. 31 डिसेंबर 2008 ला असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 पारीत केलेला आहे. या अंतर्गत असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा डेटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार केंद्र शासनाने दि. 26 ऑगस्ट 2021 रोजी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याकरिता ई-श्रम पोर्टल कार्यान्वित केले आहे. याची नोंदणी करण्याकरीता वय 16 ते 59 वर्ष अशी पात्रता असून असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारी कोणतीही व्यक्ती यामध्ये नोंदणी करू शकते. फक्त नोंदणी करणारे कर्मचारी हे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचे सभासद नसावेत. या नोंदणीसाठी आधार कार्ड, बँकेचे पासबूक, स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक अथवा कुटुंबातील अन्य व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांक ही कागदपत्रे आवश्यक आहे. तसेच स्वयंनोंदणीकरीता कामगाराचा भ्रमणध्वनी क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.