Breaking News

कोरोना काळात ऑनलाइन ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांचा सत्कार

सीकेटी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांची कृतज्ञता

पनवेल ः रामप्रहर वृत्त

तालुक्यातील सीकेटी विद्यालयाच्या प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या चौथीतील विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात अव्याहतपणे ऑनलाइन आणि शक्य तेव्हा ऑफलाइनद्वारे ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या शाळेतील सर्व शिक्षकांचा पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच शाळेत पार पडला. कोरोना महामारीमुळे शैक्षणिक प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला. विषाणूच्या भीतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेत, शाळा-कॉलेजेस बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देण्यास सुरुवात केली. आपल्या शाळेतील विद्यार्थी मागे राहून नये यासाठी त्यांना विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध स्पर्धा ऑनलाइन आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे या महामारीच्या काळात घरात बसून कंटाळा आलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची वाढू लागली. त्यामुळेच शाळेच्या पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पालक प्रतिनिधी म्हणून संजय पाटील, सुधीर वाघमारे आणि नीलम तारे यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर वाघमारे यांनी केले. शिक्षकांकडून कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना समृद्ध अध्यापनाचे धडे देण्यासाठी मेहनत घेतल्यानेच त्यांचे शिक्षण आजतागायत खंडित किंवा बंद झाले नाही, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत आम्हाला वेळोवळी अवगत केले जाते, पालकांच्याही सूचनांचा विचार करून त्यात सुधारणा केल्या गेल्या. यामुळेच आमचे विद्यार्थी स्कॉलर आहेत, याचे सर्व श्रेय शिक्षकांचे असल्याचे मत पालक प्रतिनिधी सुधीर वाघमारे यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी सर्व उपस्थित पालकांचे आभार मानले. शिक्षकांप्रती असलेल्या प्रेमाखातर पालकांनी जो आमचा सत्कार केला, त्याचा मनापासून स्वीकार करून त्यांना धन्यवाद देते, असे मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. तर परमजित कौर फगुरा, जसप्रित कौर सग्गु, बिना नायर, सुप्रिया ताम्हणकर, खरे, साक्षी पाटील आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply