Breaking News

…मग कसे वाढणार एसटीचे उत्पन्न?

पनवेल : प्रतिनिधी : एसटी महामंडळ तोट्यात जात आहे, असे सांगतानाच महामंडळाचे अधिकारी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे महामंडळाचे ब्रीद विसरून प्रवाशांना बसण्याची आसने कमी करून गाडीत प्रवाशांना त्रास कसा होईल याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे नाईलाजाने प्रवासी खाजगी गाड्यांचा पर्याय स्वीकारत आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी  याकडे लक्ष  देऊन अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. एसटीच्या गाड्यांना वरती सामान ठेवण्यासाठी असलेले जुन्या गाड्यातील कॅरियर काढून टाकण्यात आल्याने प्रवाशांना मोठे सामानही गाडीत घ्यावे लागते. गाडीची स्टेपनी गाडीत आतमध्ये ठेवावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना बसण्याची जागा कमी झाली आहे. अनेक वेळा दरवाजात समोर असलेल्या चालकाच्या मागील सीटच्या मध्ये हा टायर दगड लावून ठेवलेला असतो. एखाद्या वळणावर दगड सरकला तर टायर उभ्या असलेल्या प्रवाशाच्या अंगावर पडून अपघात होऊ शकतो. असे झाल्यास त्याची जवाबदारी मात्र चालक-वाहकावर येणार आहे. एसटीच्या अनेक निमआराम गाड्यांत स्टेपनी चालकाच्या मागे असलेल्या आसन क्रमांक 33, 34 समोर बसवण्यात आल्याने तेथे बसणार्‍या प्रवाशांना पाय ठेवायला व्यवस्थित जागा मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी कोणी बसायला तयार नसतो.ज्या प्रवाशाला या सीटचे आरक्षण मिळालेले असते तो वाहकाजवळ यावरून वाद घालतो. हे नेहमीचेच झाले आहे. काही गाड्यांत स्टेपनी ठेवण्यासाठी गाडीतील चालकाच्या डाव्या बाजूची शेवटून तिसरी सीटच काढण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन प्रवासी गाडीत कमी बसतात. महामंडळ तोट्यात जाण्याला चालक-वाहक उत्पन्न कमी आणतात असे कारण अधिकारी सांगतात,  पण उत्पन्न वाढवण्यासाठी अधिकारी काही करीत नाहीत. गाड्यांची दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. त्यामुळे गाड्या रस्त्यात नादुरुस्त होतात. गाड्या वेळेवर जात नाहीत. त्यामुळे खाजगी गाड्यांचे भाडे जास्त असूनही प्रवासी तिकडे आकर्षित होत आहेत. त्यातच गाडीतील बसण्याच्या आसनांची संख्या अशा प्रकारे कमी करून अधिकारी उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न वाहकांना करण्यास सांगतात. अशा परिस्थितीत उत्पन्न कसे वाढवायचे, असा प्रश्न  कर्मचार्‍यांना पडला आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबत अधिकार्‍यांना जाब विचारणे गरजेचे असल्याचे  प्रवाशी आणि कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. मी मुंबईला जाण्यासाठी निमआराम गाडीचे आरक्षण केले होते.

मला 34 क्रमांकाच्या सीटचे आरक्षण मिळाले होते. या चालकच्या मागच्या सीटवर बसण्यासाठी पायांना जागा कमी असताना या ठिकाणी टायर ठेवल्याने माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाला त्या ठिकाणी बसणे त्रासदायक ठरते. या ठिकाणी असलेला टायर पूर्वीप्रमाणे टपावर किंवा चालकाच्या केबिनमध्ये ठेवावा.

-नामदेव पाटील, प्रवासी

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply