कोलकाता ः वृत्तसंस्था
ताशी 120-130 किमी वेगाने पश्चिम बंगालमधील दिघाच्या किनार्यावर धडकणार्या फनी वादळाचा वेग आता ओसरला आहे. 70-80 किमीच्या वेगाने कोलकाता गाठण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच चक्रीवादळाचा वेग बराच कमी झाला आहे. हे वादळ लवकरच बांगलादेशच्या किनार्यावर आदळणार आहे.
शनिवारी सकाळी दिघाच्या किनार्यावर आदळणार्या फनी वादळाने पश्चिम बंगालमध्ये थैमान घातले आहे. या वादळाच्या प्रभावामुळे खरगपूरपासून कोलकात्यापर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. फनी वादळाच्या धोक्यामुळे कोलकाता विमानतळ बंद करण्यात आले, तर 20 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे कोलकात्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. काही इमारतींचे मोठे नुकसान झाले, तर मिदीनापूर परिसरात विजेचे खांब उखडले आहेत. मुर्शीदाबादमध्ये झाडेही कोसळली आहेत. मात्र कोलकात्याला पोहचण्याआधीच या वादळाचा वेग ओसरला असून मोठा धोका टळला आहे. लवकरच हे वादळ बांगलादेशमध्ये पोहचेल. मुर्शिदाबाद, मिदीनापूर या शहरांमध्ये आधीच पावसाने हजेरी लावली आहे. प्रशासनानेही स्थानिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. फनी वादळाच्या प्रभावामुळे देशात अनेक ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी पावसाच्या सरींचे आगमन झाले. यामुळे कडक उन्हाळ्यात नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.