Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; विजय क्लब, स्वस्तिक मंडळ बादफेरीत दाखल

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जय भवानी नवतरूण मंडळ आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक राज्यस्तीय कबड्डी स्पर्धा तळोजा येथील धरणा कॅम्प येथील मैदानावरील मॅटवर सुरू आहे. या स्पर्धेत शिवशंकर, गोलफादेवी मंडळ, दसपटी मंडळ, जॉली स्पोर्ट्स, मिडलाईन स्पोर्ट्स, बंड्या मारुती, विजय क्लब, स्वस्तिक मंडळ यांनी स्थानिक पुरूष गटात बाद फेरी गाठली. या स्पर्धेतील ड गटात उपनगरच्या स्वस्तिक मंडळाने मुंबई शहरच्या विजय क्लबला 36-35 असे चकविल्यामुळे या गटातील तीन संघाचे 4-4 असे समान साखळी गुण झाले. त्यामुळे कोणते दोन संघ बाद फेरीत दाखल होणार हे ठरविण्यासाठी कबड्डीतील नियमानुसार मिळविलेले आणि गमावलेले गुण यातील फरक काढून निर्णय घेण्यात आला. त्यात विजय क्लबचे अधिक 28गुण, स्वस्तिक मंडळाचे अधिक तीन गुण, तर शिवाजी व्यायाम मंडळाचे उणे 25गुण असा फरक आला. यानुसार विजय क्लब प्रथम, तर स्वस्तिक मंडळ द्वितीय ठरत बाद फेरीत दाखल झाले. अ गटात शिवशंकरने गोलफादेवीला 32-23 असे पराभूत करीत या गटात अपराजित रहात बाद फेरी गाठली. तर गोलफादेवीने नंतरच्या सामन्यात एनटीपीएसचा 38-34 असा पाडाव करीत दुसरा विजय मिळवित बाद फेरी गाठली. सिद्धेश पिंगळेच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. ब गटात दसपटीने साखळीतील शेवटच्या सामन्यात जॉली स्पोर्ट्सचा 37-32 असा पराभव करीत सलग तिसरा विजय मिळवीत बाद फेरी गाठली. विश्रांतीला 24-08 अशी 16 गुणांची मोठी आघाडी घेणार्‍या दसपटीला उत्तरार्धात मात्र विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. शेवटी 5 गुणांनी विजय मिळविला. अभिषेक भोजनेच्या झंजावाती खेळाला दसपटीच्या विजयाचे श्रेय जाते. जॉलीचा रजत सिंगने एकाकी शर्थीची लढत दिली. क गटात बंड्या मारुतीने जय हिंद मंडळाला 32-28 असे चितपट करीत दुसर्‍या विजयासह बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. जितेश सापतेच्या धूर्त आणि संयमी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. प्रो-कबड्डी स्टार महेंद्र रजपुतचा खेळ जय हिंद मंडळाला पराभवापासून  वाचविण्याकरिता किंचितसा कमी पडला.

 

मान्यवरांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल ः स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि. 23) अर्जुन पुरस्कार विजेत्या मायाताई आक्रे, छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते सागर बांदेकर, विलास जाधव, प्रो कबड्डीचे खेळाडी निलेश शिंदे यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या मन्यवरांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सत्कार केला. पनवेल तालुक्यातील धरणाकॅम्प येथे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने 22 ते 24 एप्रिलपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी कबड्डी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. या सर्व मान्यवरांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले. या वेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अ च्या सभापती संजना कदम, नगरसेवक हरेश केणी, अमर पाटील, अजय बहिरा, नगरसेविका विद्या गायकवाड, भाजपनेते समीर कदम, प्रशांत कदम, शशिकांत शेळके, दिनेश खानावकर, अशिष कडू, रामचंद्र कदम, शंकर शिंदे, सुमंत शिंदे, नरेश चव्हाण, सुभाष शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply