अलिबाग ः प्रतिनिधी
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित बारा वर्षांखालील एक दिवसीय 40 षटकांच्या क्रिकेट लिग स्पर्धेतील पहिले शतक पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अॅकॅडमीचा सलामीचा फलंदाज युग जोशी याने केले. दि क्रिकेट अॅकॅडमी अलिबाग विरुद्ध खेळतांना 21 चौकार आणि 1 षटकाराच्या सहायाने युग जोशी याने 125 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या पनवेल संघाने दमदार फलंदाजी करीत 40 षटकांमध्ये 10 गडी बाद 230 केल्या. त्यामध्ये सलामीला आलेल्या युग जोशी याने सुरेख फलंदाजी केली. एका बाजूने गडी बाद होत असताना दुसरी बाजू भक्कमपणे सांभाळत पनवेल संघासाठी धावांचा डोंगर रचला. अलिबागकडून पार्थ वेधक याने तीन बळी घेतले. पनवेलच्या 230 धावांचा पाठलाग करताना अलिबाग संघाने सुरेख सुरवात केली. पार्थ म्हात्रे, ओम भगत आणि ओम वार्डे यांनी अलिबाग संघाची धावसंख्या 40 षटकांच्या अखेरीस पाच गडी बाद 165 पर्यंत पोचवली. पनवेल संघाने सामना 64 धावांनी जिंकला. युग जोशी सामनावीर तर स्टार अपोनंट म्हणून ओम भगत तर उदयोन्मुख खेळाडू म्हणून पार्थ म्हात्रे, पार्थ वेदक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून वेदांत नवरत्न आणि आर्यन दवटे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 12 संघांनी सहभाग घेतला असून प्रत्येक संघाला तीन लिग सामने खेळण्यास मिळणार आहेत. वार्षिक परीक्षा संपल्या नंतर युवा खेळाडू पोयनाडच्या झुंझार युवक मंडळाच्या क्रीडांगणावर क्रिकेट खेळाचा मनमुरादपणे आनंद घेतांना दिसत आहेत.