पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या 106 लाभार्थींचे अर्ज मंजूर करण्यात आले. यासंदर्भातील सभा के. जी. म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 28) पनवेल तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
या सभेत संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकून प्रभाकर नवाळे यांनी कार्यालयात मंजुरीसाठी आलेल्या एकूण 121 अर्जांची योजनानिहाय माहिती दिली. या सर्व अर्जांची समितीच्या सदस्यांनी छाननी करून त्यापैकी 106 परिपूर्ण अर्ज मंजूर करण्यात आले व 15 लाभार्थींचे कागदपत्र अपूर्ण असल्याने त्याची पूर्तता करण्यासाठी संबंधित लाभार्थींकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या लाभार्थीचे अर्ज मंजूर केले आहेत त्यांच्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्र घेऊन त्यानंतरच लाभार्थींना लाभ देण्यात यावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. लाभार्थींकडून प्राप्त अर्जांचे पंचनामे व आवश्यक दाखले तातडीने करून देण्यासाठी संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना देण्यास सांगण्यात आले.
या सभेत संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य विजय भगत, जयराम मुंबईकर, गीता चौधरी, शंकुनाथ भोईर, योजनेच्या नायब तहसीलदार रूपाली सोनावणे, अव्वळ कारकून अशा जोशी, पनवेल पं. स.चे प्रशासन अधिकारी जी. एस. बेहरम व कार्यालयातील कर्मचारीवृंद हजर होते.