अलिबाग-सागरमाची वाडीत जाण्यासाठी रस्ताच नाही
अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग सागरगड माची येथील आदिवासीवाडीला जाणार्या रस्त्यासाठी निधी मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. बळवंत वालेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लाक्षणिक उपोषणात आदिवासी बांधव आणि ग्रामस्थ यात मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.
अलिबाग तालुक्यातील सागरगड माची आदिवासी वाडीला भौतिक सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी वनविभागाने 10 एकर जमीन उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर खंडाळे, पवेळे, रुळे आणि सागरमाची या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूरी देण्यात आली होती. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने रस्त्याचे काम गेल्या दोन दशकांपासून रखडले आहे. यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. रस्त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.