वीटभट्टी आणि टँकरमाफीयांचा डल्ला; लघु पाटबंधारे विभाग वाहनाविना हतबल
महाड : प्रतिनिधी
लघु पाटबंधारे विभागाला थांगपत्ता लागू न देता महाड तालुक्यात विविध कारणासाठी लागणारे पाणी खुलेआम नद्यांमधून उचलले जात आहे. लघु पाटबंधारे विभागाकडील वाहन सुविधेचा अभाव आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे पाणी चोरट्यांवर कारवाई करण्यास अडथळा निर्माण होत आहे. सध्या पाणीटंचाईच्या काळात महाड तालुक्यात पाणी चोरी जोरात सुरु आहे.
महाड तालुक्यात तळपत्या उन्हात ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. टंचाईग्रस्थ ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना, दुसरीकडे मात्र पाणी चोरीला उत आला आहे. महाड तालुक्यातून वाहत असलेल्या गांधारी, काळ, आणि सावित्री नदीमधून खुलेआम पाण्याचा उपसा सुरु आहे. काळ नदी ही वाळण विभागातून तर गांधारी किल्ले रायगड खोर्यातून महाड परिसरात सावित्रीला येवून मिळते. महाड शहराला लागूनच सावित्रीचे पात्र आहे. या तिन्ही नद्यांच्या किनारी वीटभट्टी व्यवसाय तेजीत सुरु आहे. या वीटभट्ट्यांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. हे पाणी थेट नदीतून उचलले जात आहे. याकरिता वीटभट्टी मालकांकडून पंपही लावले आहेत. यातील काही वीटभट्ट्या या महाड महसूल विभागाकडून रीतसर परवानगी घेऊन सुरु केल्या आहेत मात्र त्यांचे प्रमाण नगण्य आहे. महाड तालुक्यात नातेखिंड ते थेट चापगाव, मोहोप्रे, शिरगावपासून थेट वराठीपर्यंत आणि महाड शहराला लागून असलेल्या शिरगाव ते कोल, कोथेरी, बिरवाडी, वाळण विभाग या भागात अनेक वीटभट्ट्या विनापरवाना सुरु आहेत आणि राजरोसपणे पाण्याची चोरी करीत आहेत.
मुळात नदीतील पाण्याचा साठा कमी असल्याने टंचाईग्रस्त गावांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र याच नद्यांमधून टँकर चालक मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा करीत आहेत. महाड तालुक्यात असलेल्या बांधकाम प्रकल्पासाठी, सोसायट्यांमध्ये, औद्योगिक क्षेत्रात अशा विविध ठिकाणी लागणारे पाणी हे टँकर चालक सावित्री, गांधारी, आणि काळ नदीमधून उचलत आहेत. ज्या विभागाकडे या नद्यांचा ताबा आहे त्या लघु पाटबंधारे विभागाकडे वाहन आणि कर्मचारी तुटवडा आहे. संपूर्ण तालुक्यासाठी एकच कर्मचारी याठिकाणी कार्यरत असून, तोदेखील आपल्या स्वत:च्या वाहनानेच वसुली करत आहे. टँकर चालकांकडून होत असलेला कर भरणा हा अत्यंत कमी असला, तरी गेल्या काही महिन्यात जवळपास 65 हजारांची वसुली करण्यात आली आहे. भरलेल्या कराच्या दुप्पट फेर्या मारण्याचा उद्योगदेखील टँकर चालक करीत आहेत. या वर्षी मात्र एकही वीटभट्टी व्यावसायिक पाणी कर भरण्यासाठी या विभागाकडे आलेला नाही. पाणी कर भरला नसला तरी वीटभट्टीला लागणारे पाणी मात्र याच नद्यांमधून उपसा केला जात आहे.