इस्लामी शाबान महिन्यानंतर रमजान महिन्याला प्रारंभ होतो. हा महिना इस्लाम धर्मियांत अत्यंत पवित्र महिना समजला जातो. यावर्षी 2 एप्रिल रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर रमजान महिन्याला सुरुवात होऊन दि.3 एप्रिलपासून पवित्र रमजान महिन्याचे रोजे (उपवास) सुरु झाले. गेली दोन वर्षे रमजान महिन्यात कोरोना महामारीचे संकट असल्याने कोविड नियमांचे पालन करीत मुस्लिम बांधवानी रोजा, कुराण पठण व नमाज अदा केली. इस्लाम धर्मांत ईमान(अल्लाहावर श्रद्धा), नमाज, रोजा, जकात, हज ही पाच मूलभूत तत्त्वे मानली जातात. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा, कुराण पठण व नमाज(प्रार्थना) भक्तिभावाने करून अल्लाहाची इबादत करीत असतात. या महिन्यात वातावरण अत्यंत प्रसन्न असते. अगदी लहानांपासून सशक्त असणारे वयोवृद्ध रमजानचे रोजे एकाग्रतेने करीत असतात. पहाटेच्या बांगी अगोदर काही तरी थोडेफार खाऊन रोजा धरला जातो.नंतर दिवसभर अन्न, पाणी विना मुस्लिम बांधव हा रोजा (उपवास) धरीत असतात. सायंकाळी मगरीबच्या बांगीबरोबर हा रोजा सोडला जातो. त्यानंतर मगरीब व इशाची नमाज होते. इशाची नमाज झाल्यानंतर रमजानच्या एक महिना मुस्लिम बांधव तरविहची नमाज अदा करतात. या महिन्यात मुस्लिम बांधवांचा जकात (दानधर्म) यावर जास्त भर असतो. आपल्या नात्यातील कुणी गरीब असेल किंवा अन्य कोणा गरीबाला या महिन्यात जकात दिली जाते. महिनाभर भक्तिभावाने अल्लाहाची इबादत केली जाते. यानंतर महिन्यांनी रोजे पूर्ण झाल्यावर दुसर्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते. यादिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी शिरखुर्मा हे गोड पेय बनविले जाते. आज रमजान ईद आहे. या ईदची नमाज मुस्लिम बांधव सकाळी ईदगाह अथवा मशिदीमध्ये अदा करीत असतात पण कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे मुस्लिम बांधवांना घरातूनच ईदची नमाज अदा करावी लागली. ही नमाज झाल्यावर मुस्लिम बांधव एकमेकांना गळा भेट आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. पण यावेळेस जगावरील कोरोनाचे संकट जवळपास टळल्याने शासनाने सार्वजनिक कार्यक्रम व उपक्रम यावरील निर्बंध उठविले असल्याने यावर्षी रमजान ईद अत्यंत उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
-सलीम शेख, माणगाव