Breaking News

पोर्तुगीज राजवटीतील कोर्लईचे माऊंट कार्मेल चर्च

प्राचीन काळात व्यापारी बंदर म्हणून प्रसिध्दीस असलेल्या चौलमध्ये पोर्तुगिजांनी सन 1505 मध्ये व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश केला. चौल व रेवदंडासह कोर्लई या भागावर  पोर्तुगिजांचे वर्चस्व होते. कोर्लई किल्ला निजामाच्या ताब्यातून हिसकावून घेत सन 1594 मध्ये कोर्लई किल्ला काबीज केला. कुंडलिका समुद्र खाडीत प्रवेश करणार्‍या जहाजावर लक्ष्य ठेवणे कोर्लईच्या टेकडी किल्लावरून सोपे जात असे. या सगळया घडामोडीत पोर्तुगिजांची वस्ती कोर्लई  भागात होऊ लागली. पुढे स्थानिक व पोर्तुगीज यांच्यातील संवादासाठी नॉ लिंग भाषेची निर्मिती झाली. या भाषेला कोर्लई क्रिओल पोर्तुगीज असेही म्हटले जाते. सध्या कोर्लई गावाच्या एका बाजूस टेकडीच्या छायेत ख्रिश्चन बांधवाची लोकवस्ती आहे. कोर्लई येथे ख्रिश्चन बांधवाचे प्रार्थनास्थळ माउंट कार्मेल चर्च दिमाखाने उभे आहे. कोर्लईमधील ख्रिश्चन बांधवाचे प्रार्थनास्थळ असलेले माऊंट कार्मेल चर्च सन 1713 मध्ये बांधले गेल्याचे लिखीत आहे. दिडशे वर्ष चौलमध्ये सत्ता उपभोगल्यानंतर मराठ्यांशी झालेल्या युध्दात पराभव पत्करावा लागल्याने पोर्तुगीज व मराठे यांच्या तहानुसार  सन 1740 मध्ये पोर्तुगीज येथून निघून गेले. सन 1713 साली बांधले गेलेले कोर्लई येथील माउंट कार्मेल चर्च हे पोर्तुगीज काळातील असल्याचे स्पष्ट होते. अलिबागपासून 22 किमी व रेवदंडा येथून चार किमी अंतरावर  मुरूड तालुक्यात येत असलेले कोर्लई या ख्रिश्चन पाड्याच्या शेजारी तिनशे वर्षापुर्वी बांधलेले व पोर्तुगीज काळाची आठवण देणारे माउंट कार्मेल चर्च आहे. पोर्तुगीज काळापासून विशिष्ट नॉलिंग (कोर्लई क्रिओल) भाषेत संवाद करीत असलेले ख्रिश्चन बांधव व येथील माउंट कार्मेल चर्च हे कोर्लई मधील ऐतिहासिक वारसा आहे.  कोर्लई गावात आगरी, कोळी, मराठा, या प्रमुुख जातीसह ख्रिश्चन बांधवाची सुध्दा वस्ती आहे. कोर्लईच्या ख्रिश्चन पाड्यात 235 घरे  असून 1,200 लोकसंख्या ख्रिश्चन बांधवाची आहे. या ख्रिश्चन पाड्यात रोजारिओ, डिसुजा, परेरा, मार्तीस, रॉड्रिक्स, वेगास, रोचा, पेना आणि गोम्स ही प्रमुख सात घराणी तसेच गोवा व दिव-दमणमधून आलेली काही कुंटूबे येथे वास्तव्यात आहेत. कोर्लई मधील ख्रिश्चन बांधव प्रामुख्याने शेती, भाजीपाला तसेच मासेमारी हा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. काळाच्या ओघात कोर्लई मधील ख्रिश्चन पाड्यातील ख्रिश्चन बांधव मुंबई, पुणे, ठाणे, अलिबाग, रोहा, पनवेल, उरण, आदी भागात कामानिमित्त स्थळांतरीत झाले. मात्र कोर्लईच्या माउंट कार्मेल चर्च व कोर्लई ख्रिश्चन पाडा यांचेशी ॠणानबंध अद्यापी ठेवून आहेत.  साळाव येथून मुरूडकडे जाताना कोर्लईच्या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूस कोर्लई ख्रिश्चन पाड्याच्या बाजूस भव्य व पक्के बांधकामाचे माउंट कार्मेल चर्च आहे. या मांउट कार्मेल चर्चच्या बाजूलाच मांउट कार्मेल हायस्कुल आहे. सध्या माउंट कार्मेल चर्चमध्ये मुंबईतील फादर जो. बार्जेस हे कार्यरत आहेत. मुंबई-कार्डिनलच्या आर्च बिशपच्या वतीने फादर जो.बार्जेस यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोर्लई माउंट कार्मेल चर्चमध्ये कायमस्वरूपी फादरची नेमणूक सन 1845 पासून होवू लागली. पहिले  निवासी फादर म्हणून थीम द रूझारिओ यांनी सलग वीस वर्ष काम पाहिले. सन 1845 पुर्वी कोर्लई माउंट कार्मेल चर्चची व्यवस्था मुंबई-कार्डिनल आर्च बिशप मधून होत असे. चर्चमध्ये फादरची नेमणुक तीन वर्ष, सहा वर्ष गरजेनुसार तसेच कायमस्वरूपी सुध्दा केली जाते. कोर्लई माउंट कार्मेल चर्च मुंबई विभागातील 110 चर्चमध्ये समाविष्ट आहे.

विविध सामाजिक उपक्रम : 25 डिसेंबर रोजी कोर्लई येथे माउंट चर्चमध्ये नाताळ सण व नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने  ख्रिश्चन बांधव करीत असतात. नाताळ सणाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने विखुरलेले ख्र्रिश्चन समाज बांधव कोर्लई येथे एकत्रीत येतात. या निमित्त कोर्लई माउंट कार्मेल चर्चला रंगरंगोटी करण्यात आली असून विशेष प्रार्थना व पारंपरीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पारंपरिक ख्रिस्तांच्या जन्माचे गोठे उभारण्यासाठी पर्यावरण हा विषय ठेवण्यात आला आहे. वृक्षतोड, अतिवृष्टी आणि पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास आदी विषयावर या ख्रिस्त जन्माच्या गोठ्यामधून पर्यावरण जनजागृतीचा उद्देश युवावर्गाला स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येत आहे, असे कोर्लई माउंट कार्मेल चर्चचे फादर जो. बार्जेस यांनी सांगितले.

-महेंद्र खैरे, रेवदंडा

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply