जांभोशी ते कोलेटी फाटा रस्त्याचे उद्घाटन
पेण : प्रतिनिधी
पाबळखोरे आजपर्यंत विकासापासून वंचित राहिले आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून येत्या काळात कोट्यवधीचा निधी आणून
या परिसराचा विकास साधणार, असा निर्धार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (7 मार्च) येथे व्यक्त केला.
पेण तालुक्याच्या पाबळखोर्यातील जांभोशी ते कोलेटी फाटा रस्त्याचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी (7 मार्च) झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. केवळ नारळ फोडून श्रेय घेण्यापेक्षा लोकाभिमुख काम करून जनतेचे आशीर्वाद घ्या, असा टोलाही त्यांनी या वेळी विरोधकांना लगावला.
माजी मंत्री रविशेठ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, पेण तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, रायगड जिल्हा परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्यासह पाबळ विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.