Breaking News

आंबेतचा पूल बंद असल्याने कोकणात जाणार्‍या प्रवाशांचे हाल

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेतचा पूल दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. तिथे बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र ती अपुरी पडते आहे. त्यामुळे प्रवाशांना असह्य उकाडा सहन करीत तासन्तास बोटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. रायगड जिल्ह्यातून रत्नागिरीतील दापोली, मंडणगड व खेड या तीन तालुक्यांना जोडणारा सावित्री नदीवरील आंबेतचा पूल सन 1978मध्ये बांधण्यात आला. तो पूल धोकादायक बनल्याने दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते. सुमारे 12 कोटी रुपये खर्चून या पुलाची दुरुस्ती करण्यात आली. यासाठी जवळपास वर्षभर वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दुरुस्तीनंतर गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, मात्र आता पुन्हा एकदा पुलाचे काही खांब पश्चिम दिशेला झुकले असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवल्याने एसटी महामंडळाच्या बसेसअभावी नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. मंडणगड, दापोली तालुक्यांत जाणार्‍या प्रवाशांना मोठा वळसा घालून महाडमार्गे जावे लागत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी येथे प्रवासी आणि वाहने वाहून नेणार्‍या दोन बोटी शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत, मात्र सध्या उन्हाळी सुटीमुळे या मार्गावर प्रवासी आणि वाहनांची संख्या मोठी असल्याने प्रवाशांना तिष्ठत बसावे लागत आहे. सावित्री नदीवर आंबेत या ठिकाणी नवीन पूल उभारावा, अशी स्थानिकांची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव संबंधित विभागाकडून राज्य सरकारकडे गेलेला आहे, मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply