विजयी खेळीचे वरिष्ठ खेळाडूंना श्रेय
अहमदाबाद ः वृत्तसंस्था
इंग्लंडविरोधातील चौथा टी-20 सामना जिंकत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली आहे. सूर्यकुमार यादवने पहिल्याच सामन्यात तडाखेबंद अर्धशतक झळकावत भारताला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात मदत केली, पण सूर्यकुमार बाद होता की नव्हता? यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता सूर्यकुमार यादवनेही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
सॅम कॅरनच्या 14व्या षटकात डेव्हिड मलानने सूर्यकुमारचा झेल घेताना चेंडूचा मैदानाला स्पर्श झाला होता, पण मैदानावरील पंचांचा निर्णय तिसर्या पंचांनी योग्य ठरवत सूर्यकुमारला बाद घोषित केले. यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
सूर्यकुमार म्हणाला, तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करणे माझ्यासाठी सुर्वणसंधी होती. ज्या प्रकारे गोष्टी घडल्या त्याचा मला आनंद आहे. माझ्या विकेटबद्दल बोलायचे झाल्यास मी नाराज नाही. कारण काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यावर मी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण हाताबाहेर असणार्या गोष्टींसाठी काही करू शकत नाही.
सूर्यकुमारने आपल्या खेळीचे श्रेय कर्णधार विराट कोहली व अन्य वरिष्ठ खेळाडूंसह संघ व्यवस्थापनाला दिले आहे.