Breaking News

तुम्ही वाचता तेव्हा!

तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्त्वामध्ये कोणते बदल होतात? एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात. ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काहीतरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत येऊ शकतं. आता ही आत येणारी ’वस्तू‘ किती मौल्यवान आहे, किती अस्सल आहे यावर वाचनाचा आनंद अवलंबून असतो. तुमचे संस्कार जागृत होऊन नव्याने अविष्कृत होत असतील तर हे वाचन चिरस्मरणीय असेच होत असते. वाचता-वाचता तुम्ही एखाद्या अगम्य अंतर्यात्रेत निघून जाता किंवा कदाचित आत्मशोधाच्या प्रवासावर प्रयाण करता. वाचन म्हणजे जणू स्वतःचा शोधच असतो आणि आत्मशोध ही अपरिहार्य अशी अन् बहुधा अंतिम अशी मनाची अवस्था आहे. सुदैवी माणसाला त्यामुळे, आज ना उद्या वाचनाकडे वळावे लागते. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर वाचन माणसाला समृद्ध करते. दिलासा देते-कदाचित जगणे सुसह्य करते. तुमची सूचना अशी आहे की, मी अलिकडे काय वाचले आहे किंवा काय वाचतो आहे याबाबत मी काही सांगावे. त्या निमित्ताने त्या पुस्तकांची मी ओळख करून द्यावी आणि त्या निमित्ताने या पुस्तकांचे थोडेसे रसग्रहण, थोडीशी समिक्षा करावी. येथे मी काही पुस्तकांचा परिचय नोंदवतो आहे.

रति-विलास (सौ. मंजिरी पाटील)

‘रति-विलास’ नावाचे सौ. मंजिरी पाटील यांचे पुस्तक ग्रंथालीतर्फे जेव्हा परिक्षणास्तव माझ्याकडे आले तेव्हा ती एखादी पौराणिक कादंबरी असावी असे मला वाटले मुखपृष्ठही तसेच एका अभिसारखेच शिल्पमय होते, मात्र पुस्तक उघडता मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला जी मनातली सनातन प्रेम-शृंगार भावना व्यक्त करण्यासाठी स्वतःला मुल म्हणविणार्‍या स्त्रियाही संकोचतात ती भावना किंवा त्या भावनेचे कैक विभ्रम मंजिरी पाटील यांनी अत्यंत मोकळेपणी, धीटपणे पण तरीही तोल न जाऊ देता संयमपणे मांडले आहेत. खूपदा स्त्रियांनाच काय पण पुरुषांनाही आपल्या शृंगाराचे वर्णन नीटपणे करता येत नाही. अशा वर्णनांची अक्षरशः शेकडो चित्रे, आपल्या 56 कवितांतून ज्यात गीतेही आहेत, लावण्याही आहेत सौ. मंजिरी पाटील यांनी चितारली आहे. स्त्री-पुरुष संबंधातील रतीभाव एवढाच विषय घेऊन संपूर्ण संग्रह ही एक अपूर्व गोष्ट आहेच, पण यातले विविध देखणे विभ्रम, कवयित्रीच्या प्रगल्भ विचारसरणीचे धोतक आहेत. यातल्या कितीतरी कविता उद्धृत करण्याचा मोह होता. जागेअभावी मी तो टाळतोय. तरीपण काही ओळी देण्याचा मोह होतोच-

जाईजुईच्या शेजेवरती हलके नेले त्याने, अनंगचिन्हे रेखत देही चुंबियले सजणाने किंवा

सराईत नाही अशी एक वाट वळते वनाशी उतरून घाट

नदी स्वैर जेथे खळाळून वाहे तिथे थांबली एक कुलवंत आहे

किंवा मला हरवण्या… घेऊन आलीय सैन्य फुलांचे

जास्वंदाच्या… अधर पाकळ्या… लालशेंदरी

निशिगंधासम… सरळ नासिका… मोह फुलांचे

मला हरवण्या… घेऊन आलीस सैन्य फुलांचे…

ग्रंथाली प्रकाशन

सेंटर पेज (सुरेश द्वादशीवर)

सुरेश द्वादशीवर हे अभ्यासी, परखड आणि विचारांचा पाया मजबूत असणार्‍या संपादकांपैकी एक. संपादकांमध्ये असणारी बहुविधता, वेगवेगळ्या विचारसरण्यांच्या तळाला काय आहे हे पाहण्याची विलक्षण आणि विलक्षण जिज्ञासू वृत्ती आणि प्रचंड व्यासंग अशा वैशिष्टाचे द्वादशीवर लिहिताना इतके सुबोध, प्रासादिक होतात, की ललित लेखातील, सौंदर्य, शैलीमयता आळणि एक मिश्किलपणा त्यांच्या लेखनात उतरतो.

द्वादशीवर यांनी साप्ताहिक साधना मधील स्तंभासाठी एका वर्षातील लेखांचे संकलन म्हणजे ‘सेंटर पेज’ हे पुस्तक ‘सेटर पेज’ या शीर्षकाखालीच ठळकपणे ‘सोशिओ-पोलिटिकल कॉमेंट्री’ असे लिहिले आहे. त्यामुळे या पुस्तकात राजकीय नेत्यांवर खास द्वादशीवर यांनी प्रकाश टाकला असल्याचे लक्षात येते. मात्र अडवाणी, सोनिया, मोदी, मनमोहन सिंग, शरद पवार, बाळासाहेब, नितिन गडकरी, अण्णा हजारे, केजरीवाल, लालू प्रसाद, मोहन भागवत अशा राष्ट्रीय पातळीवरच्या लोकांच्या छब्या पाहताच या पुस्तकाचा पेस खूप मोठा असल्याचे लक्षात येते.

वास्तवाची सत्याची आणि मूल्यांची जागा कोणत्याही विषयाबाबतच्या दोन परस्परविरोधी टोके असलेल्या भूमिकांच्या मध्यभागी असते असे मानणार्‍या द्वादशीवारांना, एखाद्या नेत्याची टोकाची पण चुकीची किंवा तोल ढळलेली बाजू सांगताना कसलेच दडपण येत नाही. त्यामुळे एरवी स्वागतशील वाटणार्‍या या लेखांवर, अनुकूल आणि प्रतिकूल अशा खूप प्रतिक्रिया आल्या आणि हे लेखांच्या सच्चेपणाचे लक्षण आहे. भारतीय राजकारणाचा पेस समजून घेताना आपल्या नेत्यांचे बरेवाईट तळ कळणे आवश्यक आहे. द्वादशीवार अत्यंत खुलेपणाने वाचकाला, नेत्यांच्या वैचारिक बैठकीविषयी अवगत करतात. ही या पुस्तकाची सर्वात मोठी आश्वासक बाजू आहे.

साधना प्रकाशन

चिनूचे स्वप्न (रमेश तांबे)

रमेश तांबे हे बालकवितेत रमलेले एक हसरे आणि उमदे व्यक्तिमत्त्व. बालकवितेप्रमाणे मुलात रमलेले. मुलांसाठी कविता लिहिणारे, कविता म्हणणारे आणि विविध प्रकारे मुलांच्या विश्वात रमणारे. मात्र मुलांसाठी एक 150 पानांची घसघशीत सुंदर चित्रांची उत्कंठावर्धक कादंबरी घेऊन येतील असे काही वाटले नव्हते. मात्र चिनूचे स्वप्न नावाची एक लोभस कथा बाल कादंबरीच्या रुपाने आणून त्यांनी गोड धक्का दिलाच आहे, पण मराठी बालवाचक विश्वात एक मोलाची भर टाकली आहे.

मुलांना भावेल असे साधे कथानक आणि मध्येच त्यातील एका पात्राचे स्वप्नात जाणे अशा दोन, कल्पना आणि वास्तव अशा दोन पातळ्यांवर श्री. रमेश तांबे वाचकांना छान खिळवून टाकतात आणि त्यांचे हे खिळवणे चित्रकार राजेंद्र गिरधारी यांनी आपल्या सुबक रंगीत चित्रांनी खूपच देखणे केले आहे. हे पुस्तक म्हणजे सुटीत वाचण्यासाठी धडपडणार्‍या मुलांसाठी मोठा मेवाच आहे. चिमुरडी चिनू एक दिवस बाबांसोबत एका ग्रंथालयात जाते काय आणि तिच्या स्वप्नात प्राणी-पक्षी यांनी चालवलेले अजब ग्रंथालय येते काय, त्यांची रंजक गोष्ट म्हणजे पुस्तक. मुलांना वाचायला द्यावे, वाढदिवसाला कुणाला प्रेजेंट द्यावे इतके सुबक सुंदर.

मराठीत बालवाङ्मयाची जी कमरता आहे, ती भरून काढणारे सुंदर पुस्तक ‘चिनूचे स्वप्न’!

साने गुरुजी कथामाला प्रकाशन

चुटकीभर गंमत (डॉ. मृण्मयी भजक)

तुम्ही कितीही ज्ञानी असा, मोठे कलाकार असा, मोठ्या संस्थेच्या मानद पदावर विराजमान असा, राजकारणी असा वा उद्योगपती, कधीतरी तुम्हाला निखळ माणुसपणाचा मनमोकळा आनंद घ्यावासा वाटतोच. प्रत्येकात एक लोभस, सुंदर, निरागस भूतकाळ, बालपणीचा काळ दडलेला असतोच आणि अगदी उच्च स्थानावर विराजमान झाल्यावरही छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यावासा वाटतो. मोठ्या वजनदार गोष्टींऐवजी चुटकीभर गंमतही तुम्हाला समाधान देते, वयाने लहान करते आणि सार्‍या समकालीन वर्तमानाच्या रखरखीत वास्तवाचा विसर पाडते.

डॉ. मृण्मयी भजक या व्यवसायाने डॉक्टर असलेल्या लेखिकेने लिहिलेल्या छोट्या छोट्या ललित लेखांचे हे पुस्तक, पटकन आपला हात हातात घेते, आपल्याला आपल्या बालपणात नेते किंवा वास्तवातल्या आंबट-गोड प्रसंगांची चव जिभेवर आणते. आयुष्यात कितीतरी प्रसंग येतात, त्या प्रसंगात वावरताना, आपणही कितीदा किती कठोर, उगाचच ताणलेले विचार घेऊन किंवा आपले तेच खरे असे समजून वागत असतो. वस्तुतः त्याची काही गरज नसते. फक्त आपल्याला अगदी मोकळे, निर्हेतूक आणि साधे बनता आले पाहिजे. डॉ. मृण्मयी भजक यांचे अनेक प्रसंगात अत्यंत छान, निरागस वागणे नि विचार करणे या पुस्तकात उतरले आहे. ललित लेखनाची सर्वात लाडकी अट असते, त्याची वाचनीयता. त्याची रसाळ निवेदनपध्दती आणि त्यांची संवादमयता. डॉ. मृण्मयी भजक यांचे लेखन या अटी पूर्ण करतेच. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी निवडलेले इतके भन्नाट आहेत की, या विषयांवर इतके छान ललित लिहिता येते या आश्चर्यातच आपण रंगून जातो. भेट म्हणून द्यावे असे हलकेफुलके हे पुस्तक.

ग्रंथाली प्रकाशन

साता समुद्रापार (प्रथम रामदास म्हात्रे)

गेल्या वर्षभरात वाचण्यात आलेल्या चजडढ खछढएठएडढखछॠ पुस्तकामध्ये एक पुस्तक होते साता समुद्रापार. मर्चंट नेव्हीसारख्या मराठी विश्वापासून काहीसे दूर, काहीसे अपरिचित अशा समुद्रावरील जगाची सफर ही घडवते. सिंदबादच्या सफरी या अद्भूत अशा गोष्टींसाठी प्रसिध्द आहेत. त्याच्या अगदी उलट, सागरी जिवनातील अत्यंत खर्‍या, अनुभवलेल्या आणि वास्तव गोष्टी सांगणारे प्रथम रामदास म्हात्रे, या मरीन इंजिनियर असलेल्या तरुणाचे हे कथन पुस्तक खाली न ठेवता सलगपणे वाचावे इतके रंजक आणि माहितपूर्ण आहे. महाराष्ट्राला 700 कि.मी.चा समुद्रकिनारा लाभलाय मात्र, मराठी मुलं बोटीवर करावयाच्या नोकर्‍यांकडे जात नाहीत. प्रथम म्हात्रे मुलाचा शाळेपासून या नोकरीकडे ओढा होताच पण ज्या आत्मविश्वासाने त्याने ही अत्यंत ओघवत्या भाषेत लिहिलेली कहाणी! मात्र इथे लेखक लेखकाची म्हणून वेगळी कारागिरी दाखवत नाही, वा मूळ कथानकापासून ढळत नाही. सारा प्रवास, सार्‍या अडचणी, सारे भलेबुरे अनुभव तो इतक्या चित्रदर्शी पध्दतीने सांगत जातो की, तो तुम्हाला प्रत्यक्ष बोटीवरच घेऊन जातो. मर्चंट नेव्ही रियालिटी, मेन इंजिन, रोलिंग, सेलबोट, सेकंड इंजिनियर, ब्लँक कॉल, ब्लॅकआऊट, ऑईल स्विल, नाईट ड्युटी, ग्राऊंडिंग, रेस्क्यू वेकअप कॉल, शिप अरेस्ट, वॉकी टॉकी, लाईफबोट अशा बोटीवरच्या नोकरीशी संबंधित गोष्टींची माहिती देता देता टाईमपास, फिट टू वर्क, स्काय व्ह्यू मिसिंग पर्सन ऑन बोर्ड, नायरेजियन माफिया, पबेलोकॉन आयलंड अशीही ललित माहिती प्रथम म्हात्रे आपल्याला देतो. अत्यंत नम्रपणे, समजावणीच्या स्वरात आणि साध्या सरळ शब्दात आलेले हे कथन मराठीतले बहुधा पहिले आणि अत्यंत आत्मीयतेने लिहिलेले ललित लेखन आहे. नव्या तरुणांना बोटीवर जाण्यास उद्युत्क करील असे हे पुस्तक ज्यांच्या आयुष्यातून हा समुद्रमार्ग निसटला, त्यांना वेगवेगळ्या समुद्रात घेऊन जाईल.

सृजन संवाद प्रकाशन

-अरुण म्हात्रे, सुप्रसिद्ध कवी, गीतकार

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply