Breaking News

शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना पागोटे, चिर्ले येथे आदरांजली

उरण : रामप्रहर वृत्त
गौरवशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांच्या 38व्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 17) पागोटे येथे झाला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी हुतात्म्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 1984 साली उरण तालुक्यात झालेल्या गौरवशाली शेतकरी लढ्यात पाच हुतात्मे झाले होते. त्यातील तीन हुतात्मे पागोटे येथील होते.
उरण तालुक्यात 1984 साली शेतकर्‍यांचा गौरवशाली लढा झाला होता. त्या लढ्यात उरण तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोलाचे योगदान दिले होते. या लढ्यात पागोटे येथील हुतात्मा महादेव हिरा पाटील, हुतात्मा केशव महादेव पाटील, हुतात्मा कमळाकर कृष्णा तांडेल हे हुतात्मे झाले होते. त्यांचा स्मृतिदिन दरवर्षी हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, कॉम्रेड भूषण पाटील, जे. डी. तांडेल, रविशेठ पाटील, महादेव घरत, सीमा घरत, दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद तांडेल, सदस्या वनिता पाटील, समीर पाटील, प्रदीप पाटील, भाजपचे पागोटे गाव अध्यक्ष आशीष तांडेल, उद्योजक जे. एम. म्हात्रे आदींसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी ‘हुतात्मे अमर रहे’ अशा घोषणा देऊन रेल्वेस्थानकाजवळ मानवंदना देण्यात आली, तसेच या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिर्ले येथे भेट देऊन हुतात्मा नामदेव शंकर घरत यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply