Breaking News

पुरामुळे अडकलेल्या ट्रकचालकांची दैना ; पाण्यासोबत भात लागतोय खायला

सातारा : प्रतिनिधी

सांगली, कोल्हापूर, सातार्‍यात पुराची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. नागरिकांसोबत या मार्गावर अडकलेल्या ट्रकचालक आणि क्लिनर लोकांचीदेखील आबाळ सुरू आहे.

पुणे-बेंगलोर महामार्गावरील कराडच्या पुढची वाहतूक पूर्णतः थांबल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा दिसतात. सातार्‍यातील शिरवळ या ठिकाणी जवळपास तीन हजार ट्रक रस्त्याच्या कडेला उभे केले आहेत. हे ट्रक गेली चार दिवसांपासून या ठिकाणी उभे आहेत. यातील बहुतांशी चालक आणि क्लिनर हे केरळ, तामिळनाडू, कर्नाटकचे आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या घेऊन मुंबई आणि पुण्याकडे निघालेले हे चालक पुरामुळे अडकलेत.

रस्त्यात थांबवलेल्या ट्रकचे चालक आणि क्लिनर लोकांची यामुळे दयनीय अवस्था झाली आहे. यांना जेवण आणि पिण्याचे पाणीदेखील मिळत नाही. भात शिजवून पाण्यासोबत खावा लागत असल्याचे भीषण चित्र आहे.

मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि कोयना नद्यांना महापूर आला आहे.  त्यामुळे पुणे-कोल्हापूर-बंगळूरू हायवे बंद झाला आहे.  हा हायवे कायम अतिशय व्यस्त असतो, मात्र आता पुरामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यात हजारो ट्रक अडकले आहेत. दररोज हजारो ट्रक या मार्गावरून ये-जा करतात. तर यातून कोट्यवधींच्या मालाची वाहतूक होत असते. या अनेक ट्रक्समध्ये नाशवंत माल असल्याने पाणी कमी झाले नाही, तर हा माल खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठे नुकसान होईल, असे ट्रकचालकांनी सांगितले.कोल्हापूर आणि सांगलीत पूर परिस्थिती भीषण झाली असून अद्यापही हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. पुराच्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. सांगली शहर आणि परिसरात अजूनही पुराची स्थिती भीषण आहे. हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply