माणगाव : प्रतिनिधी – माणगाव उपजिल्हा रुग्णालयात म्हसळा येथील 79 वर्षीय वयोवृद्ध महिलेला कोरोनामुळे मृत्यू झाला. या मयत झालेल्या महिलेचा दहनविधी माणगाव-भादाव रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाजवळ असणार्या स्मशानभूमीत करण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, अशा दहनविधीने वा मृताच्या अस्थिंद्वारे संसर्ग होत नसल्याचा दावा उपजिल्हा रुग्णालयातील कोविड-19चे इन्चार्ज डॉ. प्रदीप इंगवले यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केला.
कोरोना बाधित रुग्णांची धास्ती सर्वांनीच घेतलेली आहे. अशातच माणगाव उपजिल्हा रुग्णालयात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू होऊन तिचा दहनविधी माणगावात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती व संताप व्यक्त केली. या दहनविधीबाबत नगराध्यक्ष योगिता चव्हाण यांनी सांगितले की, सरकारच्या सूचनेनुसार कोरोना रुग्णाचा मृत्यू ज्या गावच्या हद्दीत होईल तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने पुढाकार घेऊन त्याचा दहनविधी करायचा आहे. त्यानुसार या महिलेचा दहनविधी माणगावात केला. दहनविधी करण्यासाठी असलेल्या दोन्ही जागेत आधीच्या मयतांचे शव जळत होते. त्यानंतर पुन्हा सकाळी ते सावडायचे असते. म्हणून महिलेचा दहनविधी दुसरीकडे करण्याचा निर्णय घेतला. नगरपंचायत हद्दीबाहेर रात्रीच्यावेळी कुठे विजेची सोय नव्हती. म्हणून भादाव रस्त्याजवळ असणार्या या स्मशानभूमीजवळ विजेची सोय असल्याने तेथे महिलेचा दहनविधी केला.
दहनविधी केल्याच्या ठिकाणी निर्जंतूक फवारणी केली आहे. त्याचप्रमाणे मृत महिलेच्या अस्थी खड्डा काढून त्यामध्ये टाकण्यात येणार आहेत.
-राहुल इंगळे, मुख्याधिकारी, नगरपंचायत