Breaking News

हिवताप, डेंग्यू नियंत्रणासाठी खबरदारी

नवी मुंबई महापालिकेने शोधली 496 दूषित स्थाने

नवी मुंबई : बातमीदार

पावसाळी कालावधीत विविध प्रकारचे किटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. याविषयी नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत घ्यावयाच्या खबरदारीविषयी विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत असते. यामधील सूचनांचे पालन करून नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे. जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पाळण्यात येत असून या महिन्यामध्ये विशेषत्वाने घणसोली, नोसीलनाका, महापे, कोपरखैरणे, कूकशेत, नेरुळ खख, तुर्भे इंदिरानगर, पावणे अशा अतिसंवेदनशील कार्यक्षेत्रात घरांतर्गत विशेष डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम तसेच ताप रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत असते. या विशेष मोहिमेंतर्गत जून 2022 मध्ये आत्तापर्यंत 68,772 एवढया घरांना भेटी देण्यात आलेल्या असून त्यापैकी 1,22,884 घरांच्या आतील स्थानांची तपासणी करण्यात आलेली आहे. या पाहणीमध्ये 496 एवढी स्थाने दूषित आढळून आलेली आहेत.  याचप्रमाणे सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नियमितपणे सुरू असलेली घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम विद्यमान जून महिन्यामध्ये अधिक प्रभावीपणे राबविण्यात घेण्यात येत असून सद्यस्थितीत 81,266 घरांना भेटी देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 1,48,609 एवढ्या घरांतर्गत स्थानांची तपासणी करण्यात आलेली असून 1092 एवढी स्थाने दूषित आढळलेली आहेत. त्यापैकी 733 एवढी स्थाने नष्ट करण्यात आलेली असून उर्वरित 382 एवढी स्थाने उपचारीत करण्यात आलेली आहेत. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील बांधकाम सुरू असलेल्या 23 ठिकाणी हिवताप जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 7163 इतक्या सहभागी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी हस्तपत्रके, पोस्टर्स व बुकलेटचे वाटप करून हिवताप अथवा संशयित डेंगी इ. किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे.  या कालावधीत किटकजन्य आजारामध्ये हिवताप, डेंग्यु, चिकनगुनिया असे आजार तसेच गॅस्टो व अतिसार असेही आजार होतात. यापैकी हिवतापाचा प्रसार नाफिलिस डासाच्या मादीपासून होतो. या डासांची उत्पत्ती पाण्याच्या टाक्या, कुलरचे पाणी, रांजण, माठ, स्वच्छ पाण्याची डबकी अशा साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. डास हिवताप रुग्णास चावतो, त्यावेळी रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. असा दूषित डास निरोगी माणसास चावल्यास 10 ते 12 दिवसांनी थंडी वाजून ताप येवून डासाव्दारे हिवतापाचा प्रसार होतो. त्यादृष्टीने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळी कालावधीत होणार्‍या मलेरिया, डेंग्यु सारख्या आजारांवरील नियंत्रणाकरिता रक्त तपासणीवर महानगरिपालिकेमार्फत विशेष भर देण्यात येत आहे. अशाच प्रकारे पावसाळी कालावधीत उद्भवणार्‍या गॅस्टो, अतिसार, हगवण या आजारांबाबतही नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच ताप येणे, अतिसार, उलट्या होणे तसेच हात पाय गार पडणे, त्वचा शुष्क पडणे अशी जल शुष्कतेची लक्षणे आढळल्यास त्वरित नजिकच्या महापालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्याप्रमाणे उपचार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

पावसाळी कालावधीत होणार्‍या आजारांचा धोका लक्षात घेऊ नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा तसेच पाणी उकळून व गाळून प्यावे.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply