पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरातील बल्लाळेश्वर मंदिराजवळील वीर सावरकर चौकाच्या संरक्षण कठड्याला दोन दिवसापूर्वी पनवेल आगारातील एका एसटीने चुकीच्या बाजूने येवून धडक दिली होती. त्यामुळे या संरक्षण कठड्याचे नुकसान झाले होते. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित बस चालकाने तातडीने या संरक्षण कठड्याची
दुरुस्ती करून दिली.
दोन दिवसापूर्वी सावरकर चौकातून चुकीच्या बाजूने जाणार्या पनवेल आगारातील एसटी बस क्र.एमएच-20-बीएल-2758 ने सावरकर चौकातील रेलिंगला धडक दिली. या वेळी तेथे पनवेल महानगरपालिके तर्फे सुरक्षा रक्षकाचे काम करणारे अनिल जाधव यांनी या घटनेची माहिती सुपरवायझर यांना दिली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आल्याचे समजते. दरम्यान ही गेल्या दोन महिन्यातील तिसरी घटना असून अशा प्रकारे या चौैकातील सावरकर पुतळ्याला वाहनांची धडक बसल्यास एखाद्या वेळीस अनर्थ सुद्धा घडू शकतो. याला प्रमुख कारणे म्हणजे तीनही बाजूला उभी करण्यात येणारी दुचाकी तसेच चारचाकी वाहने त्याचप्रमाणे रिक्षा स्टॅण्ड त्यामुळे नेहमीच या सर्कलला वाहतूक कोंडी होत असते. त्यातच रस्त्याला खड्डे पडले असल्याने खड्डे चुकविण्याच्या नादात वाहन चालक येथे धडक देतात, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. तरी पनवेल महानगरपालिकेने या संदर्भात लक्ष घालून सावरकर चौकाचे सुशोभिकरण आगामी काळात करताना या संदर्भात काळजी घ्यावी व भक्कमपणे सुशोभिकरण करावे. तसेच पनवेल वाहतूक शाखेने सुद्धा मोठ्या प्रमाणात येथे उभी करण्यात येत असलेल्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच एसटी बस चालकाने स्वखर्चाने
तेथील दुरुस्ती करून दिली आहे. असे असले तरी यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी परिसरातील होणारी बेकायदेशीर गाड्यांची पार्कींग हटवावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी करीत आहेत.