Breaking News

बुलेटच्या आवाजाने ध्वनिप्रदूषण; लोक त्रस्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

बुलेटची क्रेझ तरुणाईमध्ये वाढत असून दुचाकीचा फटफट करणारा आवाज आणि वेगाशी स्पर्धा करण्याच्या क्षमतेमुळे सध्या शहरांमध्ये बुलेटचा धुमाकूळ सुरू आहे, मात्र या वाहनातील सायलेन्सरमध्ये केल्या जाणार्‍या बदलांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहन चालविताना वाहनांमधून किमान 50 डेसिबलपर्यंत आवाज हा नियमात आहे, मात्र शहरातील रस्त्यांवर धावणार्‍या बुलेटचा आवाज हा 80 ते 90 डेसिबल इतका असल्याने या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बेकायदा केले जाणारे बदल कारणीभूत आहेत. कर्णकर्कश आवाजामुळे एखादा वाहनचालक दचकून अपघाताची देखील शक्यता आहे. त्यामुळे बुलेटच्या आवाजाला लगाम कोण घालणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. बुलेटचा सायलेन्सर हा परिवहनाच्या नियमानुसार बसविलेला असतो. मात्र काही ग्राहक वाहन विकत घेतल्यानंतर त्यात बदल करून घेतात. यामध्ये सायलेन्सर बदलला जातो किंवा त्यावरील रबर ट्रॅप बसविला जातो. त्यामुळे फटाक्यासारखा मोठा आवाज होतो, असे स्पष्टीकरण बुलेट तयार करणार्‍या कंपनीने दिले आहे.

बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे ध्वनिप्रदूषणातही भर पडत आहे. या विरोधात परिवहन विभागाकडे ऑनलाइन तक्रार केली आहे.

-किरण रोडे, नागरिक

बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात नागरिकांनी तक्रार केल्यास त्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

-हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply