Breaking News

अखेर विमानतळाला मिळणार दि. बा. पाटलांचे नाव

कृती समिती आणि भूमीपुत्रांच्या लढाईला मोठे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा हेका कायम ठेवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समिती व भूमीपुत्रांच्या लढाईमुळे अखेर माघार घेत आज मंत्री मंडळाच्या बैठकीत दि. बा. पाटील यांच्या नावाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून भूमिपुत्र आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समितीने उभारलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे, अशी प्रतिक्रिया बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली, तसेच यावेळी पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
पनवेल शहरातील आगरी समाज सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी आमदार सुभाष भोईर, दि.बां.चे चिरंजीव अतुल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, गुलाबराव वझे, संतोष केणे, दशरथ भगत, जे. डी. तांडेल, नंदराज मुंगाजी, दीपक म्हात्रे, राजेश गायकर, विनोद म्हात्रे, रुपेश धुमाळ, मनोहर पाटील, निलेश पाटील, अर्जुन चौधरी, सीमा घरत,यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी दशरथ पाटील यांनी सांगितले की, गेली दोन वर्षे सातत्याने तीव्र लढ्यातून हा विजय मिळाला आहे. ऊन-पावसाची तमा न करता भूमिपुत्र दिबांच्या नावासाठी एकसंघ झाले. दि.बां.च्या नावाची भूमिका तळमळीने पुढे आली आणि याकामी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे महत्वपूर्ण योगदान या लढ्याला लागले. एकसंघ झाल्यावर काय मिळते हे या लढ्यातून स्पष्ट झाले आहे. भूमिपुत्रांच्या शक्तीमुळे हे शक्य झाले आहे त्यामुळे समितीतर्फे भूमिपुत्रांचे आभार मानतो तसेच सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत असताना समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांचेही आभार व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दि. बा.साहेबांच्या नावाचा ठराव मंत्री मंडळात पारित झाला त्यामुळे आजचा दिवस आनंदाचा असल्याची प्रतिक्रिया यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली. दिबासाहेबांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समाजाच्या विकासासाठी त्यांचे जीवन संघर्षमय झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची स्मृती कायम रहावी आणि भूमिपुत्रांना कायम प्रेरणा मिळत रहावी तसेच आपले नेते म्हणून त्यांच्या कार्याचे चीज व्हावे यासाठी या भूमीत निर्माण होत असलेल्या विमानतळाला नाव देण्यासाठी हा लढा उभा राहिला. आणि त्याला पाचही जिल्हयातील लाखो भूमिपुत्रांनी प्रतिसाद दिला. उशिरा का होईना ठराव झाला याचा आनंद झाला आहे. त्यामुळे मी मंत्रिमंडळाचे आभार मानतो. शेवट गोड झाला आहे, त्यामुळे आता सर्व पक्षातील नेते आणि लोकं सहभागी होतील, विजय झाला आहे, संघटना अबाधित ठेवा असे सांगतानाच आता पुढे दिल्लीला जायचे आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
दि. बां. च्या नावासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पूर्ण कष्ट घेतले आहे असे सांगतानाच समिती स्थापन झाली नसती आणि संघर्ष झाला नसता तर राज्य सरकारने ठराव केला नसता, असे संतोष केणे यांनी अधोरेखित करत ठरावाबद्दल आनंद व्यक्त केला.
अखेर उद्धव ठाकरे नमले…
आंदोलनात सहभागी न होणारे त्याचबरोबर एखाद्या पुलाला दिबांचे नाव द्या असे सांगणारे महाविकास आघाडीमधील स्थानिक नेते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आमच्यामुळे प्रकल्पग्रस्तांची मागणी मान्य झाले असल्याचे भासवत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन वेळच्या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बांचे नाव देण्याचे विसरा असे रोखठोक सांगितले होते. एकनाथ शिंदे यांच्यासह 38 आमदारारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील सत्तासोपानाच्या लढाईत पिछाडीवर पडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अखेर नरमले आहेत. दिबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी 2008 सालापासूनच होत होती मात्र अचानक सिडकोचा ठराव करून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे आणण्यात आले. विशेष म्हणजे ठाकरे यांची हि संकल्पना असताना शिंदे यांच्या बंडातील हवा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अचानक कलाटणी घेतली. आणि बाळासाहेबांच्या नावावर ठाम असलेले उद्धव ठाकरे यांची सपशेल शरणागती अधोरेखित झाली, आणि तशा आशयाची चर्चा पनवेल, उरणसह नवी मुंबई, ठाणेमध्ये रंगली आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply