Breaking News

शेतीत आपत्कालीन व्यवस्थापन करण्याची आवश्यकता

उपविभागीय कृषी अधिकारी आनंद कांबळे यांचे प्रतिपादन; रोहा किल्ला येथे कृषी दिन साजरा

रोहे : प्रतिनिधी

शेतीत येणार्‍या विविध अडचणींवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी शेतीत आपत्कालीन व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन रोहा उपविभागीय कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी शुक्रवारी (दि. 1) येथे केले.  कृषी संजीवनी सप्ताह समारोप व कृषी दिनानिमित्त  शुक्रवारी किल्ला रोहा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात  उपविभागीय कृषी अधिकारी आनंद कांबळे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. आपल्याकडे कमी कालावधीचे भात पिक घेतले जात असल्याने पाऊस नसल्याच्या ठिकाणी रोप वाटिका जगविणे व खताचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पाऊस न आल्यास अथवा अन्य कारणांमुळे शेतीत अडचणी येत असतील तर तेथे लागवड पध्दत बदलणे, पिक बदल, यांत्रीक पध्दतीने लागवड, रोप वाचविणे यासह अन्य पध्दतीने शेतीत बदल करणे आवश्यक आहे, असे मत उपविभागीय कृषी अधिकारी कांबळे यांनी या वेळी व्यक्त केले. रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी प्रास्ताविकात कृषी दिनाविषयी माहिती दिली. शेतकर्‍यांनी यांत्रिकीकरणाचा वापर करुन भात लागवड केली पाहिजे. त्यामुळे चांगले उत्पादन मिळते, असे सांगून कृषी विज्ञान केंद्र समन्वयक डॉ. मनोज तलाठी यांनी शेतकर्‍यांनी गादी पध्दतीचा वापर करण्याचा सल्ला दिला. पारंपरिक शेतीनंतर यांत्रीक शेती होत असताना मार्केटींग महत्त्वाचे आहे. आणि मार्केटिंगसाठी आपणच तयार होणे आवश्यक आहे, असे तहसीलदार कविता जाधव यांनी सांगितले. शेततळ्यातील मत्स्यशेती रायगड जिल्ह्यात चांगल्या पध्दतीने होत आहे. छोट्या तलावधारक शेतकर्‍यांनी  ग्रुपच्या माध्यमातून मत्स्यबीज संगोपन करण्याचे आवाहन मत्स्यतज्ज्ञ रवींद्र गोंद्रे यांनी केले. तर राहुल जोशी यांनी, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनाचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन केले.  रोहे तालुक्यात नाविन्यपूर्ण शेती करणार्‍या शेतकर्‍यांना या वेळी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच भाजीपाला बियाणाचे वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी शुभदा पाटील, बँक ऑफ इंडियाचे सौरभ फणसीकर, सरपंच योगेश बामुगडे, प्रयोगशील शेतकरी गणेश भगत, शिवाजी मुटके, अनंत मगर, सुशील रोळेकर, दगडू बामुगडे, आप्पा देशमुख, राहुल जोशी, धनंजय जोशी, हसन म्हसलाई, विनोद पाटील यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी व शेतकरी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply