Breaking News

ताम्हिणी घाट व डोंगरमाथ्यावर धुक्याची दुलई

प्रवासी, पर्यटक सुखावले

सुधागड : रामप्रहर वृत्त
हिवाळा सुरू झाल्याने रायगड जिल्ह्यात थंडी आणि धुके जाणवत आहे. डोंगरावर विशेषतः ताम्हिणी घाटात पांढर्‍या शुभ्र व करड्या रंगांचे ढग दाटत आहेत. जणू काही येथे स्वर्गच असल्याचा भास होतो. यातच आजूबाजूला पसरलेल्या गर्द हिरवाईने हा अद्भुत नजारा आणखी बहारदार होतो. त्यामुळे येथून प्रवासी, पर्यटक ढग, हिरवाई, व धुक्याचा आनंद घेत आहेत.
ट्रेकिंग व पर्यटनासाठी सध्या उत्तम वातावरण आहे. त्यामुळे बरेचसे ट्रेकर व पर्यटक किल्ले, डोंगर, समुद्रकिनारा आदी ठिकाणी भटकंती करीत आहेत. ताम्हाणी घाट, वरंध घाट व मोर्बे घाट येथून प्रवास करताना विलक्षण अनुभूती येत आहे. असंख्य पर्यटक येथे आवर्जून थांबून मज्जा लुटताना पहावयास मिळत आहे. शिवाय किल्ले रायगड, सुधागड, सरसगड, मानगड, सुरगड, मृगगड, विश्रामगड, कर्नाळा आदींसह जिल्ह्यातील इतरही उंच  किल्ल्यांवर ढग व धुके पसरलेले असते. त्यामुळे येथे येणारे दुर्गप्रेमी व ट्रेकर्स दुर्गभ्रमंतीबरोबरच ढगांची व धुक्याचा अनुभव घेतात. ताजे व प्रफुल्लीत करणारे हे वातावरण सर्वांनाच आकृष्ट करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनवृद्धीसुद्धा होताना दिसत आहे.

डोंगरावर पसरलेले ढग व धुक्यामुळे जिल्ह्यातील वातावरण आल्हाददायक झाले आहे. सकाळी या ढगांचा आणि येथील निसर्गसौंदर्याचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहे. ताम्हिणी घाटात उतरलेले ढग व हिरवाई प्रचंड आकर्षित करीत आहे.
-दत्तात्रय दळवी, पर्यटक

अनेक पर्यटक व ट्रेकर खास ढग व धुक्यांचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. धुक्याची व ढगांची चादर सर्वांचे लक्ष वेधून घेते. किल्ले व डोंगरावरील वातावरण अनुभवण्यासाठी असंख्य पर्यटक येत आहेत. शिवाय येथील प्राणीपक्षी व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत आहेत.
-उमेश तांबट, संचालक, सुधागड ट्रेकर्स

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply