यशवंती हायकर्स, अपघातग्रस्त, सर्पमित्रांची घेतली बैठक
खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यात सोमवारपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशासक अनुप दुरे यांनी सतर्कता दाखवत पालिकेची आपत्कालीन टिम तयार केली आहे. दगरडग्रस्त भागातील लोकांना स्थलांतरित करण्यासाठी शाळांंमध्ये व्यवस्था ठेवली आहे. तर अतिवृष्टीत मानवहानी आणि वित्तहानी होवू नये यासाठीची खबरदारी घेत शहरातील यशवंती हायकर्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थांचे प्रतिनिधी व सर्पमित्रांची संयुक्त बैठक घेवून आपत्कालीन परिस्थितीत समन्वयन राखण्याचे अवाहन मुख्याधिकारी दुरेंनी केले.
खोपोली शहरातील काजुवाडी, सुभाषनगर हे भाग दरडग्रस्त म्हणून ओळखले जातात. शहरातील मोठे नाले पातळगंगा नदीला जोडले असल्याने अतिवृष्टीमुळे नाल्यातील पाणी शेजारील नगरांमध्ये शिरते. तसेच पाताळगंगा नदीकाठी अनेक गावे आहेत. नदी केव्हाही धोक्याची पातळी ओलांडू शकते तसेच झेनिथ धबधब्यावर दरवर्षी पर्यटकांच्या अपघाताच्या घटना घडतात. या सर्व घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याधिकारी प्रशासक अनुप दुरे यांनी नुकताच आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी संबंधितांची बैठक बोलावली होती. उपमुख्याधिकारी गौतम भगळे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेचे गुरूनाथ साठेलकर, यशवंती हायकर्सचे पद्माकर गायकवाड, संदीप पाटील, सगळगिरे सर, सर्पमित्र अमोल ठकेकर, सुनिल पुरी, पालिकेतील गजानन जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीदरम्यान पालिकेने आपत्कालीन टिम सज्ज ठेवली असून, त्यांना लागणारी साधनसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिल्यात घटनास्थळी मदत पोहचविण्यास विलंब होणार नाही, असे मुख्याधिकारी दुरे यांनी या बैठकीत सांगितले. अपघातग्रस्त परिस्थितीत मदतीसाठी स्वतंत्र सिटीबसची व्यवस्था ठेवल्यास सदस्यांना तातडीने पोहचण्यासाठी मदत होईल, अशी सूचना गुरूनाथ साठेलकर मांडली.
आपत्कालीन परिस्थितीत हवी ती मदत करण्याचे आश्वासन देत मुख्याधिकारी दुरे यांनी सामाजिक संस्थांंचे आभार मानले.