Breaking News

किती सोसायचे?

संकट केव्हाही येऊ शकते, त्याचे स्वरूप आपल्या कल्पनेपलीकडचे असू शकते हा धडा तर आपल्यापैकी प्रत्येकाला कोरोना महामारीच्या रूपात मिळाला आहे. आपापल्या जगण्याच्या परिघात हा धडा ध्यानात ठेवूनच इथून पुढे मार्गक्रमणा करण्याची खूणगाठ आपण मनात बांधली आहे. त्यामुळेच कुठल्याही गोष्टीत पाऊल टाकतानाच संभाव्य आणि कल्पनेपलीकडल्या धोक्यांचा विचार आपल्यातील शहाणे लोक तरी नक्कीच करतील. तांत्रिक कामांच्या बाबतीत तर संभाव्य धोक्यांचा विचार करण्याची पद्धत सर्वसाधारणपणे पाळली जातेच. तरीही मग सोमवारी मुंबई आणि महानगर प्रदेशातील वीजपुरवठ्यासंदर्भात जे घडले ते कसे घडले असावे?
कोरोनाचे थैमान सुरू झाल्यापासून येईल त्या संकटाला निमूट तोंड देणे तसे आपणा सर्वांच्या अंगवळणी पडले आहे. कोरोना महामारीचा परिणाम म्हणून नाना तर्‍हेच्या अडचणींनी आपल्यापैकी अनेकांना गेल्या सहा महिन्यांहून अधिकाचा काळ घेरलेले असताना त्यात भरीस भर म्हणून की काय सोमवारी दिवसभर मुंबई महानगर आणि आसपासच्या अवघ्या परिसराला म्हणजेच ठाणे, पनवेल, कल्याण आणि डोंबिवली या भागांनाही अकस्मात वीज खंडित होण्याचा फटका बसला. यापैकी काही भागांमध्ये दोन-अडीच तासांमध्ये वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला, तर मुंबईची पूर्व उपनगरे आणि ठाण्यातील काही भागांमध्ये रात्री साडेसात ते आठपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत सुरू झालेला नव्हता. अचानकपणे संपूर्ण मुंबई महानगरासह लगतच्या प्रदेशाचीही वीज खंडित होणे हे तसे विरळच. आजच्या या विजेच्या खेळखंडोब्यामुळे शहरातील तिन्ही लोकल सेवा ठप्प झाल्या. सध्या लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्‍यांसाठी उपलब्ध असल्यामुळे अर्थातच या सेवांवरही त्याचा परिणाम झालाच असणार. मुंबईतील अनेक कोविड सेंटर्समध्ये कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना वीजपुरवठा खंडित होण्याचा फटका बसला तर काय अशी चिंता कोणाच्याही मनात डोकावणे स्वाभाविक आहे, परंतु सर्व कोविड सेंटर्समध्ये पॅावर बॅकअपची सोय असल्याचे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. सर्व खासगी कार्यालयांसह सरकारी कार्यालये मात्र वीजपुरवठा खंडित झाल्याने बंद झाली. लोकल ठप्प झालेली असल्यामुळे घरी परतू इच्छिणार्‍यांचे हालच झाले. घरून काम करणारे आणि ऑनलाइन शिकणारे विद्यार्थी यांचाही गोंधळच झाला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आजच्या पेपरसंदर्भातील अनिश्चिततेमुळे पराकोटीच्या ताणाला तोंड द्यावे लागले. त्यातच संपूर्ण मुंबई महानगर परिसरात ठिकठिकाणी निरनिराळ्या वेळी वीजपुरवठा सुरू झाल्याने गोंधळात भरच पडली. महापारेषणाच्या 400 केव्ही कळवा-पडघा केंद्रात सर्किट एकची देखभाल सुरू होती. या वेळी सर्व भार सर्किट दोनवर होता. त्यात अचानक बिघाड झाल्याने आजची परिस्थिती उद्भवली असे सरकारकडून सांगितले गेले आहे. या प्रकाराला जबाबदार कोण याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात संध्याकाळी तातडीची बैठकही बोलावली. आता हे सारे नेहमीचेच आहे. अशा चौकशांचे नेहमी जे होते ते याही वेळी मात्र घडू नये. लोकांनी किती सोसायचे, विद्यार्थ्यांनी किती सोसायचे? कोरोना काळात असा प्रसंग ओढवणे हे मूळच्या संकटात मोठी भर टाकणारे आहे याची जाणीव सर्व संबंधितांनी ठेवायलाच हवी.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply