Breaking News

नेरळ-माथेरान घाटरस्ता अपघातमुक्त करावा

टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्थेची मागणी

कर्जत : बातमीदार

नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या एका बाजूने आरसीसी गटारे बांधण्यात आली आहेत. मात्र ती गटारे दगडांनी भरली असून पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. दरम्यान, माथेरान घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक दगडी धोकादायक अवस्थेत असून त्या दगडांना बाजूला करून घाटरस्ता अपघातमुक्त करावा, अशी मागणी नेरळ-माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्थेने केली आहे.

तीन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या माध्यमातून नेरळ-माथेरान घाटरस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला संरक्षण भिंती तसेच गटारे बांधण्यात आली. त्यावेळी अनेक ठिकाणी रस्ता रुंद करण्यासाठी डोंगरातील दगड फोडण्यात आले होते. त्यामुळे अनेक दगड खिळखिळे झाले आणि तेंव्हापासून पावसाळ्यात या घाटरस्त्यावर  सतत दरडी कोसळत आहेत.

कोसळलेले दगड आणि डोंगरात अर्धवट राहिलेले दगड यामुळे वाहनचालकांच्या मनात या घाटरस्त्याने प्रवास करताना सतत धाकधूक असते. मागील दोन वर्षात घाटरस्त्याच्या बाजूला असलेली गटारे दगडांनी भरून गेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात गटारातून पाणी वाहून जात नाही. ते पाणी सरळ रस्त्यावरून वाहते. परिणामी रस्त्याचे डांबरीकरण खराब होण्यास सुरुवात झाली आहे.

या घाटरस्त्याची गटारे तात्काळ दगडमुक्त करावीत, अशी मागणी नेरळ-माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.  या पत्रावर संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कराळे, उपाध्यक्ष तौसिफ़ सरावले, रवींद्र मिसाळ, संतोष पार्टे,कार्याध्यक्ष सलीम नजे, संतोष लिये, सचिव मिलिंद सुर्वे, यशवंत मोरे तसेच नावेद नजे, सचिन लोभी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

नेरळ माथेरान घाटरस्त्यातील चांगभले मंदिराच्या वळणावर असलेली दरड सुटावल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तर काही ठिकाणी दरडी  सुटावलेल्या अवस्थेत असून त्या कोणत्याही क्षणी पडून अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घाटरस्त्याच्या दुरुस्तीची कामे करून घेण्याची मागणी केली जात आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply