नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे. आता दिवस-रात्र म्हणजे 24 तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे तसेच पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदन करता येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारने हर घर तिरंगा मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेंतर्गत 13 ते 15 ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा फडकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना केले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांना याबाबत पत्र दिले आहे. दरम्यान, भारतीय ध्वज संहिता 2002मध्ये 20 जुलै 2022च्या आदेशानुसार सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच नागरिकांच्या घरी तिरंगा फडकविता येणार आहे. यापूर्वी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकवण्यात येत होता तसेच पॉलिस्टरचे आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजांना परवानगी नव्हती, पण आता पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करण्याची परवनागी देण्यात आली आहे तसेच 24 तास तिरंगा फडकविता येणार आहे.