प्रशासनाकडून ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना
पोलादपूर ः प्रतिनिधी
पोलादपूर तालुक्यातील चरई ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वडाचा कोंड गावालगत डोंगराला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने तेथे पाहणी करून ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्याची माहिती प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि तहसीलदार दिप्ती देसाई यांनी दिली. मागील वर्षी 22 जुलै रोजी अतिवृष्टीमध्येे महाड तालुक्यातील तळिये येथे भूस्खलन होऊन 87 जणांचा मृत्यू झाला होता, तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे व साखर सुतारवाडी येथे झालेल्या भूस्खलनात 11 जण मृत्युमुखी पडले होते. या घटनेला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले असून पोलादपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडाचा कोंड गावाच्या वरील बाजूला असलेल्या डोंगराला भेगा पडल्या आहेत. तेथील शेतकरी सतीश बांदल हे शनिवारी सकाळी बकर्या आणि गुरांना चरण्यासाठी डोंगरावर घेऊन गेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबत तत्काळ चरई ग्रामपंचायतीला कळविले. यानंतर याची माहिती पोलादपूर तहसील कार्यालयाच्या आपत्ती निवारण कक्षाला ग्रामपंचायतीकडून देण्यात आली. महाड उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, पोलादपूर तहसीलदार दिप्ती देसाई, तलाठी सुनील वैराळे यांनी एनडीआरएफच्या जवानांसह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान डोंगरावर जिथे भेगा पडल्या आहेत त्या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून चरई वडाचाकोंड येथील ज्ञानेश्वरवाडी व हनुमानवाडी ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्थलांतरीत नागरिकांची सर्व व्यवस्था प्रशासनाकडून केली जाईल आहे, असे या वेळी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी सांगितले, मात्र स्थलांतराला ग्रामस्थांचा प्रतिसाद न मिळाल्याने रविवारी प्रशासनाने ग्रामस्थांसोबत पुन्हा चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीला ग्रामस्थांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.