अलिबाग : प्रतिनिधी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि कोंकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 31) कर्जत येथील कोंकण ज्ञानपीठ शैक्षणिक संकुल येथे बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार, उद्योजकता व कौशल्य परिवेश रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मेळाव्यात आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, युरेका फोर्ब्स, क्रिस्टल सोल्यूशन, प्रॉपर्टी सोल्यूशन, रिलायन्स जीओ, कॅटलिस्ट, सुप्रीम टुल्स अॅन्ड सोल्यूशन मॅन्यूफॅक्चरिंग पुणे, ब्राईट टुलिंग मॅन्युफॅक्चरिंग पुणे, कलश इव्हेन्ट अॅन्ड प्रमोशन नवी मुंबई, टोक्रँक शोरूम तळोजा, नवी मुंबई, फिलिप कार्ट, पीव्हीआर डी मार्ट आदी आस्थापनांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. याकरिता एसएससी पास/नापास, बारावी, पदवी, पदवीकाधारक, आयटीआय, पदवीधर अभियंता आदी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी मुलाखतीस येताना स्वत:च्या बायोडाटाच्या चार प्रती, चार फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका आणि त्यांच्या छायांकित प्रतींसह मेळाव्यास उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02141-222029वर कार्यालयीन वेळेत किंवा पवार (9820452264) अथवा भोसले (9762185794) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.