चेस्टर-ली-स्ट्रीट ः वृत्तसंस्था
विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडला 119 धावांनी धूळ चारून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रो विजयाचा शिल्पकार ठरला.
इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 306 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव अवघ्या 186 धावांमध्ये संपुष्टात आला. मार्क वूडने तीन गडी बाद केले. न्यूझीलंडकडून टॉम लॅथमची अर्धशतकी कामगिरी वगळता इतर एकही फलंदाज खेळपट्टीवर टीकू शकला नाही.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या इंग्लंडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रोनं सलग दुसर्या सामन्यात शतकी कामगिरी केली. तर जेसन रॉयने 60 धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत कर्णधार इयॉन मार्गनची 42 धावांची खेळी केली. स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड हे तीन संघ निश्चित झाले आहेत. तर चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंडचे नाव निश्चित मानले जात आहे. कारण पाकिस्तानला चौथे स्थान गाठण्यासाठी बांगलादेशच्या संघाला तीनशेहून अधिक धावांच्या फरकाने पराभूत करावे लागणार आहे.