पनवेल ः रामप्रहर वृत्त
मुंबईच्या प्रभादेवी येथील कामगार क्रीडा भवनात झालेल्या राज्य सब ज्युनियर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर या पुरुष आणि महिला गटाच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी 13 पदके जिंकली. ही स्पर्धा महाक्रीडा प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगडच्या कुणाल पिंगळे, कमल जोशी, अमृता भगत, निकर्ष जाधव, (ज्युनिअर स्पर्धा) व महेश कृष्णा पाटील (मास्टर स्पर्धा) यांनी सुवर्णपदक, विनायक मारुती पाटील (मास्टर स्पर्धा) व अथर्व लोधी (ज्युनिअर स्पर्धा) यांनी रौप्यपदक, तर आरती शिंदे (सब ज्युनिअर स्पर्धा), प्रथमेश भालेकर (ज्युनिअर स्पर्धा), प्रितम मंडल, रोशन पाटील, शुभम कांगले (सिनिअर स्पर्धा) व राजेश अगंद (मास्टर स्पर्धा) यांनी कांस्यपदक पटकाविले. या सर्व खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू संतोष तुकाराम गावडे (अलिबाग) यांनी बहुमोल सहकार्य केले. या यशाबद्दल रायगड जिल्हा संघटना अध्यक्ष गिरीश वेदक, सचिव अरुण पाटकर, सहसचिव सचिन भालेराव, सदस्य संदीप पाटकर, राहुल गजरमल आणि कार्याध्यक्ष यशवंत मोकल यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी संजय सरदेसाई यांनीसुद्धा त्यांचे अभिनंदन केले.