Breaking News

श्रीसदस्यांतर्फे श्रमदानातून वनराई बंधारा

पोलादपूर ः प्रतिनिधी

तालुक्यातील तुर्भे खुर्द येथे पोलादपूर तालुक्यातील श्री सदस्यांच्या वतीने 2019 वर्षातील अखेरच्या रविवारी (दि. 29) श्रमदान करून सावित्री नदीच्या उपनदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पोलादपूर परिसरातील श्री सदस्यांच्या वतीने रविवारी तालुक्यातील तुर्भे खुर्द येथील उपनदीवर सामूहिक श्रमदानातून वनराई बंधार्‍याची निर्मिती करण्यात आली. ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यात्मिक व सामाजिक कार्याच्या समन्वयातून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम, रक्तदान, आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, बसथांबा शेड बांधकाम, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थीवर्गासाठी वय व अधिवास दाखला इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे माणसाला माणसाशी, अध्यात्माशी व समाजसेवेशी जोडण्याचे अभूतपूर्व काम डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अखंड प्रेरणेतून व उमेशदादा धर्माधिकारी तसेच पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कार्याचा वारसा जपण्याच्या उद्देशातून पोलादपूर श्री सदस्यांनी तुर्भे खुर्द येथे वनराई बंधारा निर्मिती उपक्रम आयोजित केला होता.

रविवारी सकाळी साडेसात वाजता बंधार्‍यासाठी सुरू झालेल्या श्रमदानामध्ये तालुक्यातील 190 श्री सदस्यांसह तुर्भे खुर्द गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांसह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. 70 फूट लांब व चार फूट उंचीच्या या बंधार्‍यासाठी 700हून अधिक मातीच्या पिशव्यांचा उपयोग करण्यात आला. ही बंधारा निर्मिती तुर्भे खुर्द परिसराला विविध दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. यामुळे उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे, तसेच परिसरातील लोकांना दैनंदिन कामासाठी, गायीगुरांना पिण्याच्या पाण्यासाठी या वनराई बंधार्‍याचा उपयोग होणार आहे. बंधार्‍यात पाण्याची साठवणूक झाल्यामुळे आजबाजूच्या विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ होणार असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी देऊन बंधारा उपलब्ध झाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply