भाजप युवा मोर्चाकडून आंदोलनाची पोलखोल
पनवेल : वार्ताहर
कोरोनाच्या संकटात देशासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याविषयी कोणताही अभ्यास न करता अगर माहिती न घेता राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न युवक काँग्रेसने बाळबोध आंदोलनातून केला, अशी टीका भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे अज्ञान दूर करण्याचे काम भाजप युवा मोर्चा काढेल, असेही पाटील यांनी मुंबईत पोलखोल करताना म्हटले.
या वेळी भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, आमदार प्रसाद लाड, राम कदम, प्रवक्ते केशव उपाध्याय आदी उपस्थित होते.
विक्रांत पाटील म्हणाले की, 20 लाख कोटी रुपये हे विविध योजनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारतासाठी खर्च केले जाणार आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रितीने त्याची मांडणी ’आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत’ या पुस्तकातून केली आहे. या पुस्तकाच्या प्रति भाजयुमोतर्फे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देण्यात येणार होत्या, पण भाजयुमोचे कार्यकर्ते उत्तर देण्यास तयार असल्याने आपला प्रयत्न फसतो असे लक्षात येताच युवक काँग्रेसचे कोणीही भाजप कार्यालयाकडे फिरकलेच नाही.
महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज्य सरकारने सकारात्मकपणे काम करावे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा निरोप आपल्या पक्षश्रेष्ठींना द्यावा, असा सल्लाही पाटील यांनी दिला.